,वैजापूर, ता . 19 - जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरु असताना येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात एका इच्छुकाने सोमवारी (ता.19) गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड व निवडणूक कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच अरेरावीची भाषा करत टेबलवरील नामनिर्देशनपत्रांचा चुरगळा करून या पत्राना धोका निर्माण होईल असे वर्तन केले. तुला पाहून घेतो अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला अशी फिर्याद डॉ. जऱ्हाड यांनी पोलिसात दिली आहे. याप्रकरणी बाळासाहेब बनसोडे (रा. जामगांव) याच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
या फिर्यादीनुसार, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, निवडणूक कामी नेमलेले विष्णू बिरेवाड, अमोल घुसळे, अशोक म्हस्के, नरेश आडेपवार फोटोग्राफर शांताराम मगर व ईतर नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे काम करत होते.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाळासाहेब बनसोडे हा नाम निर्देशन कक्षात आला व त्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जऱ्हाड यांना उद्देशून ' तुम्ही आम्हाला नामनिर्देशन पत्राची व्यवस्था व्यवस्थित केली नाही' असे म्हणत सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अरेरावीची भाषा केली.नामनिर्देशनाचे महत्वाचे काम सुरु आहे याची जाणीव करून देऊनही त्याने गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणला. याशिवाय 18 जानेवारीलाही बनसोडे हा दोन बाऊन्सर सोबत घेऊन निवडणूक कक्षात आला व त्याने तहसीलदार सुनील सावंत यांच्यासोबत गोंधळ घातला. तुम्ही नामनिर्देशन पत्राची किंमत शंभर रुपये का ठेवली ? अशी विचारणा त्याने अधिकाऱ्यांना केली होती असे फिर्यादीत म्हंटले आहे.
0 Comments