news today, वैजापूर भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट ; पैशाशिवाय कामच होत नसल्याचा आरोप

वैजापूर, ता .01- ज्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय मिळायला हवा, तेच कार्यालय सध्या भ्रष्टाचार, दलाल आणि बेकायदा वसुलीचे केंद्र बनत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. वैजापूर भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत काझी नावाच्या कर्मचाऱ्यावर पदाचा उघड दुरुपयोग करून सरकारी फाइल्स घरी नेणे, कामे थांबवून लाच मागणे आणि दलालांच्या माध्यमातून आर्थिक शोषण केल्याचे सनसनाटी आरोप करण्यात आले आहेत.

भूमी मोजणी, नकाशा दुरुस्ती, नामांतर, वारस नोंद यांसारख्या संवेदनशील प्रकरणांत काझी याची भूमिका महत्त्वाची आहे. याचाच गैरफायदा घेत तो अनेक अर्जदारांच्या संचिका जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवतात. ‘चढावा’ दिल्याशिवाय फाइल पुढे सरकत नाही, तर पैसे देणाऱ्यांची कामे मात्र चुपचाप मार्गी लावली जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गुरुवारी भूमी अभिलेख कार्यालयात नागरिक एकत्र जमा होऊन यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस हाफिज काकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वैजापूर शहराध्यक्ष जुबेर चाऊस आणि एबीएस ग्रुपचे विजय त्रिभुवन यांनी उपअधीक्षकांकडे लेखी तक्रार सादर केली. दरम्यान, काझी यांचा कार्यालयात विचारणा करण्यासाठी शोध घेतला असता ते गायब असल्याचे आढळून आले. चौकशी केली असता ते कोणतीही रजा न घेता घरीच असल्याचे उघड झाले. या प्रकाराची दखल घेत उपअधीक्षक विजय संधानशिव यांनी काझी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून गैरहजेरीबाबत खुलासा मागितला आहे. तसेच तातडीने प्राप्त तक्रार वरिष्ठ स्तरावर पाठवून योग्य कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी संचिका घरीच !

या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे सरकारी फाईल्स कार्यालयाबाहेर नेऊन काझी आपल्या निवासस्थानी ठेवत असल्याचा आहे. हा प्रकार नियमांचे उघड उल्लंघन असून दस्तऐवजांमध्ये फेरफार होण्याची गंभीर शक्यता निर्माण करतो. काही फाईल्स आजही त्याच्या घरी असल्याचा दावा करत तातडीने छापेमारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

डिजिटल लाचेचा प्रकार ...

भ्रष्टाचाराची पद्धत आता डिजिटल झाल्याचेही समोर आले आहे. दुर्गानगर परिसरातील एका प्रकरणात ‘फोन पे’द्वारे लाच स्वीकारल्याचा आरोप असून, त्यासंबंधी डिजिटल व्यवहाराचा पुरावाही तक्रारीसोबत सादर करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments