राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा ..
मुंबई, ता.07 - कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारने पुढचे पाऊल टाकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27चा अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने 2008-09 च्या अर्थसंकल्पात कर्जमाफी दिली होती. त्यानंतर 2017 मध्ये फडणवीस सरकारने छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ उध्दव ठाकरे सरकारने 2029 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली होती. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणातून सुटका व्हावी म्हणून अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. परंतु, या योजनेसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.याशिवाय कर्जमाफी योजनेसाठी अटी शर्ती सुद्धा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये ...
पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा केली. त्यानुसार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लाभ दिला जाईल. कर्जमाफीसोबत बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसीनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
0 Comments