वैजापूर शहरातील ऑटोमोबाईल दुकानाला भीषण आग..

वैजापूर, ता .06 - शहरातील मुरारी पार्क परिसरातील एका ऑटोमोबाईल दुकानाला शुक्रवारी (ता.06) सायंकाळी सुमारे नऊ वाजेच्या  सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली, या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

आग लागल्यानंतर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र हा खूप भीषण असल्याने तिला लवकरात आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.
त्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. 

घटनेची माहिती मिळताच नगर पालिकेचे अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी जगन्नाथ थोरात यांच्या नेतृत्वाखाली गणेश निकम, संग्राम ठाकूर, सुमित चिंधाळे, संकेत कवडे, अक्षय वहाडने तसेच वाहन चालक वसीम शेख, रमेश त्रिभुवन आणि प्रमोद निकाळे यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे शेजारील इतर दुकानांना लागणारा धोका टळला.

मात्र, या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, दुकानातील ऑटोमोबाईलचे संपूर्ण सुटे भाग आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे दुकानदाराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच आ.रमेश बोरणारे, वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले.





Post a Comment

0 Comments