news today, खंडणीसाठी बिहारी तरुणाचे अपहरण ; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

वैजापूर, ता.06 - खंडणीसाठी बिहारी तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच पैशाची मागणी करत त्याला हातातील धातूच्या कड्याने मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम, डिजिटल घड्याळ, गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल फोन असा सहा हजार 300 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी सायंकाळी शहरातील बोथरा पेट्रोल पंपासमोर घडली.

इम्रान अलीम अन्सारी (वय 19) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असून तो मुळचा बिहार राज्यातील भोजपुर जिल्ह्याच्या बसाउरी येथील रहिवासी आहे. मात्र, रोजगारासाठी तो वैजापूर येथे राहत आहे. त्याने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमाखली गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
  

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, इम्रान अन्सारी हा बिहारी तरुण वैजापूरातील एका बांधकाम प्रकल्पावर काम करत आहे. बुधवारी सायंकाळी तो मार्केटमध्ये असताना बोथरा पेट्रोल पंपावर दुचाकीवर आलेल्या तीन आरोपीनी त्याचे अपहरण केले. त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फोनद्वारे पैशाची मागणी केली. तसेच त्याला मारहाण केली, हातातील धातूच्या कड्याने मारहाण केली व खिशातील रोख 300 रुपये , दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल, एक हजार रुपये किमतीचे डिजिटल घड्याळ, तीन हजार रुपये किंमतीची गळ्यातील चांदीची बारीक चैन असा ऐवज चोरला. यातील दोघांनी पांढऱ्या रंगाचा तर एकाने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता व त्यांची दाढी व केस वाढलेले होते तसेच ते मराठी व हिंदी भाषा बोलत होते असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments