news today, वैजापूर - गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वरचे आवर्तन 23 दिवस सुरू राहणार पाणी

पायथा - माथा नियमानुसार होणार पाणी वाटप ...

वैजापूर, ता.5 - वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेले आवर्तन  वैजापूर तालुक्यात दाखल झाले असून हे आवर्तन सुमारे 21 ते 23 दिवस सुरू राहणार आहे. या आवर्तनातून अंदाजे 1.4 टीएमसी पाणी मिळणार आहे. ‘पायथा ते माथा’ नियमानुसार प्रथम गंगापूर, त्यानंतर वैजापूर आणि पुढे कोपरगावला पाणी देण्यात येणार आहे. मात्र कालव्यालगत पाईप टाकून तसेच डिझेल पंपांच्या सहाय्याने पाणी चोरीचे प्रकार वाढत असल्याची चर्चा आहे. पाटबंधारे विभागाचा बंदोबस्त अपुरा पडत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कडक कारवाई आणि खडा पहारा आवश्यक आहे.

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींसह पाणीवापर संस्थांनी रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्याची मागणी नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे  केली होती. त्यानंतर या विभागाने प्रस्ताव नाशिक पाटबंधारे विभागाकडे पाठविला. मंजुरीनंतर 23 फेब्रुवारीपासून ४०० क्युसेकने पाणी जलदगती कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन 21 ते 23 दिवस चालणार असून ‘पायथा ते माथा’ नियमानुसार प्रथम गंगापूर आणि त्यानंतर वैजापूरला पाणी दिले जाणार आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच कालव्यावर पाणी चोरीचे प्रकार वाढत असल्याने प्रशासनाचे नियोजन अपुरे पडत असल्याची चर्चा आहे. आवर्तन सुरळीत पार पाडणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात अनेक मोठी धरणे असून तब्बल 120 किलोमीटर लांबीचा कालवा आहे. कोपरगाव (7), वैजापूर (49) आणि गंगापूर (46) अशा एकूण 102 गावांतील सुमारे 43 हजार 560 हेक्टर क्षेत्राला या कालव्याचा लाभ होतो. 49 पोटचाच्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शेतकरी इंजिन, पाईपलाईन आणि मोटारी लावून थेट कालव्यातून पाणी उचलत आहेत. काही ठिकाणी भूमिगत पाईपलाईन टाकून बेकायदा उपसा सुरू असल्याने विभागालाही त्याचा ठावठिकाणा लागत नाही. परिणामी, सिंचन व्यवस्थेवर पाणीचोरांचा विळखा घट्ट होत असल्याचे चित्र आहे.

400 क्युसेसने पाणी...

सध्या कालव्यातून 400 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून नंतर ते 800 क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कालवा परिसरात एक वाहन तीन शिफ्टमध्ये सतत गस्त घालणार असून अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

-सचिन ससाणे, उपविभागीय अभियंता, वैजापूर

Post a Comment

0 Comments