वैजापूर, ता. 05 - छञपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अखेर मुहूर्त ठरला असून येत्या 18 मार्च रोजी नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश काढले असून प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडणुका 20 मार्चपूर्वी घेण्यात याव्यात, असे आदेश देणारे पत्र ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
बुधवारी (ता.18) मार्च रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये मतदानाद्वारे नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केली आहे. अध्यक्षपदासाठी नामांकन सभेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी स्वीकारले जातील.सभेसाठी एकूण सदस्यांच्या 1/3 गणपूर्ती असणे आवश्यक आहे.
सद्याच्या राजकीय परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी विविध पक्षांनी आपल्या सदस्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काहींनी तर सदस्यांना सहलीवर पाठविण्याची तयारीही सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
0 Comments