अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध निवड
छञपती संभाजीनगर, ता.19 - अध्यक्ष, .उपाध्यक्ष पदाचे सूत्र ठरल्यानंतरही शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि खासदार संदीपान भुमरे यांनी सत्तेची नवीन गणिते घालण्याच्या प्रयत्नांना भाजपने बाजूला सारले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीभोवती रंगलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीत अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घातला.
जिल्हयात एक खासदार, सहा आमदार असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाजूला बसण्याची वेळ आली ! तर ऐनवेळी शिवसेनेने घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही बहुमताचा आकडा गाठताना अक्षरशः सर्कस करावी लागली.
छञपती संभाजीनगर जिल्हयात 23 जागा मिळवून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेसच्या निवडून आलेल्या एकुलत्या एक सदस्याने भाजपशी घरोबा केल्याने ही संख्या 24 झाली. भाजपपाठोपाठ शिवसेनेने 21 जागा मिळवून दुसरा क्रमांक गाठला. तर अजित पवार गटाने 4 जागा जिंकल्या. यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीची निर्विवाद सत्ता येणार असे चित्र होते. त्यासाठी भाजप, शिवसेना, अजित पवार गटाच्या बैठकाही झाल्या.मात्र, शिवसेनेने इतरांच्या मदतीने भाजपला दूर ठेवून जिल्हा परिषद ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. खासदार संदीपान भुमरे यांना आपल्या पुतण्या शिवराज यांचा राज्याभिषेक करायचा होता. तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मुलगा आमीर याची ताजपोशी करायची होती.त्यामुळे चर्चेतून काहीही साध्य झाले नाही. भाजप सत्तेत सन्मानजनक भागीदारी देत नसल्याचा कांगावा करत शिवसेना नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
आपल्या नातेवाईकास अध्यक्षपद देण्याचा नादात ठरलेले सूत्र शिवसेना नेत्यांनी मोडीत काढण्याचा आरोप भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी विजयानंतर बोलताना केला. तर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचे परिणाम राज्याच्या राजकारणात उमटू शकतात असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये सदस्य फोडण्यासाठी सावे यांनी अपारंपरिक ऊर्जा खात्यातील अधिकाऱ्यांना कामास लावले होते, त्यांना पैशाचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला.
0 Comments