वैजापूर, ता .27 - वैजापूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच विशेष बैठक वादळी ठरली. या सभेत भ्रष्टाचार, मनमानी व प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे गंभीर आरोप झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. गेल्या वर्षी प्रशासकराजच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या विहिरींच्या मंजुरीसाठी अनेक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 30 -30 हजार रुपयांपर्यत 'वसुली' करण्यात आली. मात्र आता त्यांच्या विहिरींची मंजुरी अचानक रद्द करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक नुकसान व प्रशासकीय अन्यायाचे बळी ठरत असून त्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी कार्यालयांचे चक्कर मारावे लागत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला.
पंचायत समिती सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गटनेते राहुल लांडे यांनी सभेत उघडपणे आरोप करत सांगितले की, प्रशासक कालावधीत नियमांना बगल देत मनमानी निर्णय घेण्यात आले व भ्रष्टाचार खुलेआम सुरू होता. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत प्रशासनाने नव्या सदस्यांची ओळख करून देत आरोग्य, पशुसंवर्धन, मग्रारोहयो, घरकुल आदी विविध योजनांचा लेखाजोखा सादर केला. मात्र आढावा सुरू असतानाच सदस्यांचा संताप उफाळून येत होता. यावेळी घरकुल योजनेत अभियंते वेळेवर बांधकामाचे फोटो घेत नाहीत, त्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान महिनोन्महिने अडकते, अशी तक्रार करण्यात आली. फोटो अपलोड करण्याच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे मागितल्याच्या तक्रारीही येत असल्याचे सांगण्यात आले. मग्रारोहयो योजनेत मंजुरीपासून देयकापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ‘कट’ संस्कृती हावी असल्याचे आरोप करण्यात आले. योजनांची माहिती गावपातळीपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचत नसल्याने दलालांमुळे गरीब आणि शेतकरी योजनांपासून वंचित राहत असल्याचे नमूद करण्यात आले. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, अनियमितता तात्काळ थांबवली नाही तर संपूर्ण प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली जाईल. पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीबाबत आधीपासूनच संघर्षाच्या चर्चा सुरू होत्या; मात्र बैठकीत उघडपणे झालेले आरोप स्थानिक राजकारणाचे तापमान वाढवणारे ठरले आहेत. जाणकारांच्या मते, आगामी काळात पंचायत समितीच्या बैठकींमध्ये प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. ज्या प्रकारे भ्रष्टाचार आणि अव्यवस्थेचे मुद्दे उपस्थित झाले, त्यावरून नवे पदाधिकारी विकासकामांत पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. वैजापूर पंचायत समितीची ही बैठक सध्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
0 Comments