मुंबई, ता.20 - नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात (कॅप्टन खरात) याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर आज, 20 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. खरातच्या ‘श्री शिवनिका संस्थान’मध्ये त्या विश्वस्त होत्या, तसेच त्यांचे खरातची पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. रुपाली चाकणकर यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.
सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेता चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले. विरोधकांसह महायुतीतील नेत्यांकडूनही त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि तपासावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
0 Comments