news today, खंडाळा येथे गोवंश जातीची जनावरे व गोमांस जप्त ; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर, ता.28 - तालुक्यातील खंडाळा येथे पोलिसांनी छापा टाकून अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश केला. गोवंश जातीची  6 जनावरे व 800 किलो गोमांस जप्त केला. छाप्यात 10 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता.27) रात्री वैजापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की. खंडाळा गावातील चिराखाणी परिसरात हैदर रऊफ शेख याच्या मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची छुप्या पद्धतीने कत्तल सुरू असून, काही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे समजले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख यांनी पोलिस पथक तयार करून रात्री 12 च्या सुमारास खंडाळा येथे छापा टाकला व घटनास्थळावरून हैदर रऊफ शेख (26 वर्ष, रा. खंडाळा), मोहसिन ईसाक कुरेशी (35 वर्ष, रा. श्रीरामपूर), मुस्तकिन अहेमद कुरेशी (25 वर्ष, रा. खंडाळा), मोहीद रियाजत खाँन (45 वर्ष), सलमान अनिस खाँन (34 वर्ष) आणि कलीम सलीम अन्सारी (30 वर्ष) या तिघांना जे मूळचे उत्तर प्रदेशातील बहेरीच जिल्ह्यातील आहेत त्यांना ताब्यात घेतले. याशिवाय ईस्माईल लाला शेख, साजीद सलीम कुरेशी, ईब्राहीम लाला शेख, शाहबाज महेमुद कुरेशी आणि दिलावर अशा एकूण 12 जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 

या छाप्यात पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा मुद्देमालही जप्त केला आहे. यामध्ये 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 800 किलो गोमांस, दोन पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप गाड्या (क्रमांक MH 20 GB 3441 आणि MH 21 X 1823), कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून कत्तलीसाठी डांबून ठेवलेली सहा जिवंत जनावरे पोलिसांनी वाचवली आहेत. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे, पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक नरोटे, पोलीस हवालदार झाल्टे, पोलीस कॉन्स्टेबल नाचन, सुंदडे, केरे, बनगे, निकम आणि सदगीर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणी पोलीस हवालदार कुलदीप सिद्धार्थ नरवडे (बकल नं. १०९१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा 2015 चे कलम 5, 5(ब), 5(क) आणि 9, तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेली जनावरे सुरक्षेच्या कारणास्तव आणि देखभालीसाठी कोल्ही (ता. वैजापूर) येथील 'कामधेनु गोशाळेत' जमा करण्यात आली आहेत.






Post a Comment

0 Comments