news today, नितेश राणे यांना एक महिना कारावासाची शिक्षा

मुंबई, ता.28 - कणकवली येथील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहणाऱ्या अभियंत्यावर चिखलफेक करून मारहाण करण्याचे प्रकरण सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांची काही आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली असली तरी सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि इतरांना त्यास उद्युक्त करणे या कलमाखाली त्यांना दोषी धरून एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. देशमुख यांनी सोमवारी (ता.27) हा निकाल दिला.या प्रकरणातील अन्य 29 संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असून, तोपर्यंत या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती त्यांचे वकील ॲड. संग्राम देसाई यांनी दिली. 

हे प्रकरण जुलै 2019 मधील आहे. त्याकाळात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची स्थिती अत्यंत खराब होती. खड्डे आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुके नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.4 जुलै 2019 रोजी मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी कणकवलीचे तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बोलावले होते. यावेळी कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त करत शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता.तसेच त्यांना बांधून ठेवून चिखलातून चालत नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी प्रकाश शेडेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 30 जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून राणे यांच्यासह 30 जणांविरोधात 353,332,504 आणि 506 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, बहुतांश कलमांमधून नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.मात्र, भारतीय दंड संहितेतील कलम 504 (सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग) अंतर्गत त्यांना दोषी धरून न्यायालयाने त्यांना एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर आरोपींच्या वतीने शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments