news today, अन् मृत बहिणीचा सांगाडा घेऊन तो बँकेत पोहोचला ; बँकेने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने भावाने उचलले पाऊल

ओडिशातील धक्कादायक घटना...

भुवनेश्वर, ता.29 - मृत बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी पुराव्यासाठी हट्ट धरल्याने चक्क बहिणीचा सांगाडा घेऊन भाऊ बँकेत पोहोचला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना मंगळवारी (ता.28) ओडिशा राज्यातील किओंझर जिल्हयात घडली. बँक अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे भावाला हे पाऊल उचलावे लागले. बँकेत सांगाडा पाहून अधिकाऱ्यांची चांगली भंबेरी उडाली.

जितु मुंडा (वय 50 वर्ष) असे या भावाचे नाव असून ओडिशा राज्यातील डायनाली गावातील तो रहिवाशी आहे.
त्याची बहीण कालरा मुंडा (वय 56 वर्ष) यांचा 26 जानेवारी 2026 रोजी मृत्यू झाला होता. कालरा मुंडा यांच्या बँक खात्यात नामनिर्देशित पती आणि मुलाचाही यापूर्वीच मृत्यू झाला होता. बहीण कालरा मुंडा यांच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी जितु मुंडा यांना ओडिशा ग्रामीण बँकेच्या शाखेत वारंवार चकरा मारल्या. बहिणीचा मृत्यू झाल्याचा  सातत्याने दावा करूनही बँक अधिकाऱ्यांनी त्याची कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. मृत बहिणीचा पुरावा बँकेला दाखविल्याशिवाय पैसे मिळणार नाही असे त्यांनी सांगितले. या त्रासाला कंटाळून जितूने दफन केलेल्या बहिणीचा सांगाडा बाहेर काढला व तो खांद्यावर घेऊन थेट बँक गाठली. बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन तो जवळपास तीन किलोमीटर पर्यंत पायी चालला.बँकेत सांगाडा पाहून अधिकाऱ्यांची चांगली भंबेरी उडाली.तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृताचा सांगाडा ताब्यात घेऊन तो सन्मानाने दफन करण्यात आला.

जितू हा अशिक्षित असून आदिवासी जमातीचा आहे. जितूला कायदेशीर वारस किंवा नॉमिनी म्हणजे काय हे माहीत नव्हते. बँक अधिकारीही त्याला मृत व्यक्तीच्या खात्यातील पैसे काढण्याची प्रक्रिया समजावून सांगू शकले नाहीत. बँकेत सांगाडा आणल्याने बँकेत उपस्थित लोक थक्क झाले. हा सांगाडा जितूच्या बहिणीचा होता की व्यवस्थेचा होता असा प्रश्न अनेकांना पडला.




Post a Comment

0 Comments