आमदार रमेश बोरणारे यांना निवेदन देताना कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अभिजित सोनी, भरतसेठ गायकवाड, बाळासाहेब मतसागर व इतर
वैजापूर, ता.27 - महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन (पुणे) यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत बंदला 'वैजापूर तालुका कृषी साहित्य विक्रेता संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारच्या जाचक अटींविरोधात आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 27 एप्रिलपासून तालुक्यातील तब्बल सव्वा तीनशे कृषी सेवा केंद्र चालक या बेमुदत बंदमध्ये सहभागी झाले असून त्यांनी दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत. दरम्यान संघटनेच्यावतीने आमदार रमेश बोरनारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
5 वर्षांपासून मागण्या प्रलंबित ...
कृषी निविष्ठा (बियाणे, खते, कीटकनाशके) विक्रेत्यांच्या मागण्या 5 वर्षांपासून प्रलंबित आहेत. राज्याच्या कृषी विभागाकडून यावर वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्याने कृषी केंद्र चालकांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे.
या आहेत प्रमुख मागण्या...
खत कंपन्यांकडून खतांचा पुरवठा होताना केले जाणारे 'लिंकिंग' (इतर उत्पादने घेण्याची सक्ती) त्वरित बंद व्हावे, सीलबंद पाकिटातील बियाणे, खते किंवा कीटकनाशकांचे नमुने तपासणीत अप्रमाणित आढळल्यास, विक्रेत्याला 'आरोपी' न करता कायद्यातील तरतुदीनुसार 'साक्षीदार' मानावे, मुदतबाह्य कीटकनाशके परत घेण्याची सक्ती विक्रेत्यांवर न करता उत्पादक कंपन्यांवर करावी, खतांवरील नफा (मार्जिन) आयकर व जीएसटी खर्चाचा विचार करून 8 टक्के करण्यात यावा. तसेच सर्व खते विक्रेत्यांच्या दुकानापर्यंत पद्धतीने मिळावीत, 'साथी पोर्टल'चा वापर करण्याची सक्ती किरकोळ विक्रेत्यांवर न करता बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांवर करावी, केंद्र शासनाचे कृषी विभागाकडून प्रस्तावित नवीन बियाणे व कीटकनाशके कायदा 2025 मधील जाचक नियम शिथील करावेत, हवामानातील बदलामुळे पिकांचे (उदा. आंबा, काजू) नुकसान झाल्यास त्यासाठी कीटकनाशक विक्रेत्यांना जबाबदार धरू नये, विनापरवाना व दुय्यम दर्जाची कृषी उत्पादने विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी या व इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची मागितली माफी....
या बेमुदत बंदच्या काळात ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र हा लढा शेतकरी व कृषी सेवा केंद्र चालकांच्या हितासाठीच असल्याचे संघटनेने म्हटले आहे. बंद काळात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबद्दल वैजापूर कृषी साहित्य विक्रेता संघटनेने शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.
तालुक्यात 100 टक्के कडकडीत बंद....
या राज्यव्यापी बंद मध्ये वैजापूर कृषी साहित्य संघटनेचे अध्यक्ष अभिजीत सोनी, प्रशांत कंगले, प्रशांत पवार, रवी जेजुरकर, परेश कोठारी, बाळासाहेब मतसागर, संजय घागरे, बाबासाहेब आव्हाळे, राजेंद्र साळुंके, रवी पाटणी, सुरेंद्र संचेती, संजय जाधव, नितीन चुडीवाल, रिखब पाटणी यांच्यासह तालुक्यातील सर्व 325 कृषी सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
0 Comments