news today, वैजापूर तालुक्यात गोदा - नर्मदा जल जागृती यात्रेचे उत्साहात स्वागत

शिवसेना - भाजप युतीतील नाराजी चव्हाट्यावर ...
या दोन्ही पक्षाकडून स्वतंत्रपणे जलयात्रेचे स्वागत !

वैजापूर, ता.27 - जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या 'गोदा ते नर्मदा' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026 चे वैजापूर तालुक्यात सोमवारी (ता.27) भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.“निर्धार महाराष्ट्राचा – संकल्प जलसंवर्धनाचा” या घोषवाक्याखाली आयोजित या जलयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे या स्वागत कार्यक्रमात शिवसेना -  भाजपमधील नाराजी चव्हाट्यावर आली. या दोन्ही पक्षाकडून स्वतंत्रपणे जल यात्रेचे स्वागत करण्यात आले.


लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ही जलयात्रा 26 एप्रिल ते 31 एप्रिल दरम्यान पार पडत असून, जलसंवर्धन, संस्कृती जपणूक आणि लोकसहभाग या उद्दिष्टांवर आधारित जनजागृती मोहीम म्हणून राबविण्यात येत आहे. गोदावरीच्या उगमापासून सुरू झालेली ही जलयात्रा नाशिक आणि संगमनेरमार्गे वैजापुरात  पोहोचली असता भाजप - शिवसेना युतीमधील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे या जल यात्रेचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.

शिवसेनेच्यावतीने गंगापूर रस्त्यावरील मुरारी पार्क भागात जल यात्रेचा स्वागत सोहळा पार पडला.आ.रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, पंचायत समितीच्या सभापती वंदना शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती रामहरी जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड, नगरसेवक संजय बोरनारे, नगरसेवक सुलतान खान, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जलयात्रेचे भव्य स्वागत केले. 

तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षाच्यावतीने लाडगांव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित या स्वागत कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हाजी अकील सेठ, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, उपनगराध्यक्ष शेख रियाज, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, नगरसेवक विशाल संचेती, बाजार समितीचे सभापती कल्याण दांगोडे, नगरसेवक दशरथ बनकर, दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण, नगरसेवक प्रशांत कंगले, कैलास पवार, सुरेश राऊत यांच्यासह स्थानिक नागरिकांनी अभूतपूर्व उत्साहात या जलयात्रेचे स्वागत केले. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी नेते सदाभाऊ खोत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

महालगांव येथे यात्रेचे पारंपरिक पद्धतीने स्वागत ...

महालगांव येथे यात्रेचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यावेळी गावातील मान्यवर, युवक, नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. जलसंवर्धनाचे महत्त्व, पाणी बचतीची गरज आणि भविष्यासाठी जलसंपत्ती जपण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. या जलयात्रेतून “विचार, वारसा आणि विकास” यांचा संगम साधत समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.तसेच या उपक्रमातून समाजातील प्रत्येक घटकाला पाण्याचे महत्त्व पटवून देत संवर्धनासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात आली.

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक जागृती यांचा संगम ठरत असून जल व्यवस्थापनाचा व संवर्धनाचा “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा संदेश जनमानसात दृढ करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरत आहे.






Post a Comment

0 Comments