हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही - जिल्हाधिकारी
वैजापूर, ता.06 - सध्या सुरु असलेली जनगणना व मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) ही सरकारची महत्वाकांक्षी कामे आगामी दृष्टीने महत्वाची असून ही कामे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावीत तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळू मिळावी यासाठी वाळूचे घाट निश्चित करा, तालुकास्तरीय अधिकारी व ग्राम स्तरीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना गावात भेटण्यासाठी आठवड्यातील दोन तीन दिवस निश्चित करून त्याचे वेळापत्रक आपल्या कार्यालयातील दर्शनी भागात लावावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी (ता.06) येथे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. समाधानकारक उत्तरे न देणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली. प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा अशी सूचना गौडा यांनी केली.
बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनीही कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बैठकीला उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळ, तहसीलदार सुनील सावंत, गट विकास अधिकारी रावसाहेब चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, मंडळ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत तहसीलदार सुनील सावंत यांनी महसूल विभागासह विविध कामांची स्थिती स्लाईडच्या माध्यमातून सादर केली. जिल्हाधिकारी यांनी पाणीपुरवठा, दहा हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जमिनीच्या नोंदी, गायरान जमिनी, सरकारी जमीन, वर्ग दोनच्या जमिनी, जनगणना, विशेष सखोल पुनरावलोकन, घरकुलसाठी वाळू घाट निश्चित करणे, आपले सरकार वरील तक्रारी, अवैध वाळू उपसा रोखणे, 2011 पूर्वीचे अतिक्रमण याबाबत आढावा घेऊन कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले.
जनता दरबारसाठी नागरिकांचा आक्रोश ...
विविध समस्या व प्रलंबित कामांचे निराकरण करण्यासाठी आयोजित जनता दरबार होत नसल्याने नागरिकांनी चांगलाच आक्रोश केला. आढावा बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मंत्रालयीन व्हिडिओ कॉन्फरेन्स (व्हीसी) असल्याने ते तात्काळ गट विकास अधिकारी यांच्या कक्षात गेले व त्या ठिकाणी एक एक अर्ज स्वीकारून नागरिकांचे प्रश्न निकालात काढण्याचे साधारण नियोजन होते. मात्र, यावेळी संतापलेल्या नागरिकांनी बीडीओ कक्षासमोरच जमा होऊन घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व शिऊर पोलीस ठाण्याचे एपीआय वैभव रणखांब यांनी गर्दी नियंत्रित करून नागरिकांना सभागृहात थांबण्याच्या सूचना केल्या. त्यांनतर जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी दामोधर पारिक, निवृत्ती सोनवणे, मनोज नळे, राम पिल्दे आदिसह अनेक नागरिकांनी समस्या मांडल्या व निवेदन सादर केले.
0 Comments