news today, कांद्याच्या प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गटाचे समृध्दी महामार्गावर चक्काजाम आंदोलन !

 
अंबादास दानवे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात  ; शेतकऱ्यांनी पोलिसांची गाडी अडवली ..

वैजापूर, ता.17 - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोमवारी (ता.18) सकाळी समृध्दी महामार्गावरील जांबरगांव टोल नाका (इंटरचेंज क्र.19) येथे तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले आणि सरकारच्या निष्क्रिय धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. 

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरला. शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावरील जांबरगाव येथे ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.. पहिल्यांदाच समृद्धी महामार्ग रोखून शिवसैनिकांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बुलंद आवाज उठवला व रस्त्यावर उतरून सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना दाखवून दिल्या. शिवसेना नेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कांदा उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांनी यावेळी पोलिसांची गाडी अडवली.

कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्याच्या घामाला योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने कमी भाव मिळत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नाफेड मार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करणे, कांद्याला किमान दोन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करणे, प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देणे,कांद्याची निर्यात खुली करणे, कांदा चाळ उभारणीसाठी 75 टक्के अनुदान देणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगांवकर, तालुकाप्रमुख मनाजी पाटील मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, मनोज गायके, ॲड.रमेश सावंत, युवासेना जिल्हा उपप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे, दिनेश मुथा, राजू पाटील गलांडे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








Post a Comment

0 Comments