वैजापूर, ता.०५ - आगामी खरीप हंगाम लक्षात घेता कृषी विभागाने सन २०२६-२७ साठी वैजापूर तालुक्यास विविध रासायनिक खतांचे एकूण ४६ हजार ८३२ मेट्रिक टन आवंटन मंजूर केले आहे. यामध्ये युरिया व संयुक्त खतांचा सर्वाधिक समावेश असून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाने पूर्वनियोजन सुरू केले आहे.
जिल्हास्तरीय मंजूर आवंटनानुसार वैजापूर तालुक्यास युरिया खताचे १७ हजार ३२८ मे.टन आवंटन करण्यात आले आहे. याशिवाय डीएपी खत ३ हजार ५२० मे.टन, एमओपी ८०० मे.टन, संयुक्त खतांचा १९ हजार ५६८ मे.टन तर एसएसपी खताचा ५ हजार ६१६ मे.टन साठा मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यात एकूण ४६ हजार ८३२ मे.टन खतांचा पुरवठा होणार असल्याने खरीप हंगामात खतटंचाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वैजापूर तालुका हा कृषिप्रधान तालुका असून कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, कांदा तसेच भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच खतांची मागणी वाढत असल्याने कृषी विभागाने कंपन्या व विक्रेत्यांसोबत समन्वय साधून पुरवठा सुरळीत ठेवण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, संयुक्त खतांना यंदा सर्वाधिक मागणी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माती परीक्षणानुसार संतुलित खतवापरावर भर देण्यात येत असून शेतकऱ्यांना शिफारसीनुसारच खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. दरम्यान काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच जादा दराने विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करावी तसेच कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.
कृषी विभागाची करडी नजर...
खत विक्रेत्याना ई-पॉसने खत विक्री करणे अनिवार्य आहे. कुणीही खत, युरिआ व इतर बाबींचा साठा करू नये. नियम डावलून विक्री करणाऱ्या तालुक्यातील दोन दुकानदारांचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मार्च महिन्यापासून युरिआ व डीएपीचा अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.
जे.डी. वाघमारे
कृषी अधिकारी, पंचायत समिती, वैजापूर
0 Comments