--------------------
वैजापूर, ता.01- चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (ता.31) सापळा रचून शिताफीने अटक केली. सतनामसिंग उर्फ अजयसिंग चंदसिंग बावरे (वय 38 वर्ष) रा. देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून चोरी केलेली मारुती कंपनीची चारचाकी इको गाडीसह एक मोटारसायकल व दरोडा टाकण्याचे साहित्य असा 2 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील जीवन गंगा सोसायटीतील केतन अजित रामैय्या यांनी त्यांची मारुती कंपनीची चारचाकी इको गाडी (एम. एच. 20, ए.पी.3812) चोरीला गेल्याची तक्रार 28 जुलै रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णीसिंह यांनी स्थानिक गुन्हा शाखेला दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला असता त्यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सतनाम सिंग उर्फ अजयसिंग बावरे वय 38 वर्ष रा. देऊळगाव राजा याने आपल्या साथीदारांसह केलेला असून चोरी केलेली मारुती कंपनीची चारचाकी इको गाडी एम. एच.20, ए.पी.3812 घेऊन सावंगी बायपास मार्गे येत आहे. या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तत्काळ सावंगी बायपास येथे जाऊन सापळा लावला असता चोरीला गेलेली चारचाकी इको गाडी येताना दिसली. गाडी थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सतनाम सिंग उर्फ अजय सिंग बावरे (वय 38 वर्ष रा. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा) असे सांगितले व त्याने आपल्या साथीदारासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच वैजापूर बसस्थानक येथून एक युनिकॉन मोटारसायकल चोरी करून ती सावंगी बायपास येथे रोडच्या बाजूला शेतात लपवून ठेवली आहे असे सांगितले. यावेळी गाडीची तपासणी केली असता त्यात दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य कटवणी, लोखंडी टॉमी, कैची तसेच चोरीची युनिकॉन कंपनीची मोटार सायकल एम. एच. 20, इ. व्ही.1753 मिळून आली. अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल डोके, गोपाल पाटील, राहुल गायकवाड,प्रशांत नांदवे, समाधान दुबेले, योगेश तरमळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments