news today, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी किरण पाटील तर डॉ.कल्याण काळे प्रदेश उपाध्यक्ष

मुंबई ता.31- अखिल भारतीय काँग्रेस समितीने मंगळवारी रात्री महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी तसेच काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली. जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.कल्याणराव काळे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांची प्रदेश सरचिटणीसपदी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही नियुक्ती केली आहे.

राजकीय क्षेत्रात डॉ.काळे यांचा प्रदीर्घ आणि समृद्ध असा कार्यानुभव आहे.वपंचायत समिती संभाजीनगरचे उपसभापती, देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच पूर्व व फुलंब्री मतदारसंघातून आमदार अशी लोकप्रतिनिधींची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी युवाशक्तीला दिशा दिली असून 2020 पासून ते संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वीही विलास औताडे यांनी विविध पदे भूषविली आहेत. 

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्षपदी अखेर नव्या नावाची घोषणा झाली असून, पक्षाशी निष्ठावान असलेले किरण पाटील डोणगांवकर यांच्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. किरण पाटील हे महाविद्यालयीन जीवनापासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. युवक काँग्रेस सरचिटणीसपदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. काँग्रेसमध्ये सरचिटणीस व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. जिल्हा बँकेचे 28 वर्षांपासून ते संचालक आहेत, सद्या ते बँकेचे व्हॉईस चेअरमन आहेत. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण पाटील हे 3 ऑगस्ट रोजी सूत्रे स्वीकारतील .

 

Post a Comment

0 Comments