news today, वैजापूर तालुक्यात युरिया मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त ; कृषी विभागाचा नॅनो युरिया वापरण्याचा सल्ला


वैजापूर, ता.31 - तालुक्यात मका लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याचा थेट परिणाम युरियाच्या मागणीवर झाला आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे युरियाचा तात्पुरता तुटवडा निर्माण झाला असून, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांवर युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत असल्याचे दृश्य गेल्या पंधरा दिवसांपासून पाहायला मिळत आहे. वैजापूर शहरात 45 शहरी आणि 270 ग्रामीण परवानाधारक कृषी सेवा केंद्रे कार्यरत असून, दरवर्षी साधारणतः 70 हजार हेक्टरवर कापूस लागवड केली जाते. मात्र, यंदा कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मका पिकाकडे मोठ्या प्रमाणात कल दर्शवला आहे. परिणामी, मका लागवडीचे क्षेत्र तब्बल 78 हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.

या अनपेक्षित बदलामुळे युरियाची मागणी झपाट्याने वाढली आहे. सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्याने उपलब्ध साठा झपाट्याने संपला. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना खत मिळवण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की युरियाचा पुरवठा थांबलेला नाही. एकाच वेळी मागणी वाढल्यामुळे हा तात्पुरता तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर युरियाच्या वापराला पर्याय म्हणून नॅनो युरियाचा पर्याय आहे. नॅनो युरिया हे अधिक प्रभावी व खर्चिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते. 5 मिली नॅनो युरिया प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करता येते. पहिली फवारणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी व दुसरी फवारणी 40-45 दिवसांनी केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते.............................................................................
 युरिया सह विविध खतांची साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे-- राजेश कोळेकर, शेतकरी, वांजरगांव.........................................................................
येत्या दोन ते तीन दिवसांत २४२ टन युरिया तालुक्यात दाखल होणार असून, त्याचे वितरण सर्व सेवा केंद्रांवर सुरळीतपणे केले जाणार आहे-- राजु उरडे, कृषी अधिकारी, वैजापूर............................................................................

Post a Comment

0 Comments