वैजापूर, ता .28 - नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने एकूण 24 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. यात नगरसेवक पदासाठीचे 23 उमेदवार तर नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
या निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झालेल्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), एमआयएम, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले सुभाष गायकवाड यांनाही आवश्यक किमान मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, प्रत्येक उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल करताना ठरावीक अनामत रक्कम भरावी लागते. मात्र, जर एखाद्या उमेदवाराला पडलेल्या वैध मतांच्या किमान एक अष्टमांश (1/8) मतेही मिळाली नाहीत, तर त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते. तथापि, नामांकन अर्ज रद्द झाल्यास किंवा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही रक्कम परत केली जाते. तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना अनामत रक्कम परत देण्याची तरतूद आहे. मात्र, मतदारांकडून आवश्यक मतांची पूर्तता न झाल्यास नियमाप्रमाणे रक्कम जप्त केली जाते. या निकालामुळे काही पक्षांना वैजापूरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, अनेक नवोदित तसेच अनुभवी उमेदवारांना मतदारांचा विश्वास संपादन करण्यात अपयश आले आहे. परिणामी, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अनामत जप्त झाली असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांची नावे व मिळालेली मते अशी-
सुभाष गायकवाड (काँग्रेस) – 1047 मते
समी शेख (एमआयएम) – 108
सय्यद मुजफ्फर (वंचित बहुजन आघाडी) – 7
शालू मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – 57
खान जाबाज (वंचित बहुजन आघाडी) – 39
पठाण जुनेद (काँग्रेस) – 109
दीपककुमार मालकर (शिवसेना उबाठा) – 39
शेख साबिहा (काँग्रेस) – 113
सय्यद आफरीन (एमआयएम) – 238
मेहुल पोकर्णे (अपक्ष) – 222
हितेश रामैय्या (काँग्रेस) – 66
दीपक त्रिभुवन (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – 134
शाक्यासिंह त्रिभुवन (काँग्रेस) – 124
कैलास आंबेकर (काँग्रेस) – 63
बिनबिलेस यासेर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – 126
शेख शमीम (शिवसेना उबाठा) – 228
सविता धुळे (काँग्रेस) – 82
सुनील त्रिभुवन (अपक्ष) – 31
शुभम नन्नवरे (शिवसेना उबाठा) – 30
सिद्धार्थ बागुल (वंचित बहुजन आघाडी) – 47
संदीप वाघ (काँग्रेस) – 74
विशाल शिंदे (अपक्ष) – 20
रेखा आंबेकर (काँग्रेस) – 247
पूजा क्षीरसागर (काँग्रेस) – 147
0 Comments