मुंबई, ता. 28 - 50 टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका निवडणुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर केली जाणार आहे. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या 20 जिल्हा परिषदांमध्ये मात्र लगेचच निवडणुका होणार नाही.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. 50 टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण असावे अशी अट ही न्यायालयाने घातली आहे. राज्यातील 32 पैकी 20 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे या 20 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या वगळता अन्यत्र निवडणुका घेतल्या जातील असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्यातील 32 पैकी लातूर, छञपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असून ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अहील्यानगर, जालना, बीड या 20 जिल्हापरिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. 51 ते 100 टक्क्यांपर्यंत आरक्षण या जिल्हा परिषदांमध्ये देण्यात आले आहे.
त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार 50 टक्क्यांपेक्षा आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा जिल्हापरिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया 17 जानेवारीपर्यंत संपणार आहे. त्यानंतर जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम ...
निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार 6 ते 8 जानेवारी दरम्यान निवडणुकीची अधिकृत घोषणा होऊ शकते. त्यानंतर 10 ते 17 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालेल.18 ते 20 जानेवारी दरम्यान अर्जाची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. 21 जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. या प्रक्रियेनंतर 30 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान आणि 31 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
0 Comments