political news, शेतकरी कर्जमुक्तीसाठी प्रहार संघटनेचे राज्यभरात चक्काजाम आंदोलन


आंदोलनाची पुढील दिशा 29 जुलैला ठरणार 

छत्रपती संभाजीनगर, ता. 26 - शेतकऱ्यांना कर्जमाफीसह शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता.24) राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात माजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भर पावसात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.यावेळी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचीही उपस्थिती होती.

प्रहार संघटनेच्या आंदोलनाला खासदार कल्याण काळे व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट देऊन बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन दिले.या आंदोलनात सहभागी आंदोलनकर्त्यांनी कृषीमंत्री यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.तसेच प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलनात पत्त्याचे डाव खेळून तसेच पत्ते दाखवून कृषिमंत्र्याच्या कृतीचा निषेध नोंदविला.

आंदोलनाची पुढील दिशा 29 जुलैला ठरणार -  बच्चू कडू 

माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मृतिस्थळी  गहुली (पुसद) येथे येत्या 29 जुलैला राज्यभरातील शेतकरी नेते चिंतन करतील आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला नाही तर ट्रेलर नंतरचा पिक्चर जास्त तापदायक असेल असा इशारा बच्चू कडू यांनी या आंदोलना- दरम्यान दिला.यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांच्या दडशाहीचा निषेध केला. ज्या जिल्ह्यामध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची व शेतकऱ्यांच्या मालाच्या हमी भावाची चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला, तिथे पुन्हा चक्काजाम करणार, आता कुठलीही पूर्व सूचना न देता मंत्रालयात शिरू असेही कडू म्हणाले.

सरकारला राज्यात अशांतता हवी

सरकारला राज्यात अशांतता हवी आहे. म्हणूनच कर्जमाफीचा निर्णय घेतला जात नाही. कर्जमाफीसाठी समिती नेमली पण अध्यक्षाला माहिती नाही.आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली आहे. आत्महत्या करण्याऐवजी लढा दिला पाहिजे. कृषीमंत्री विधानसभेत रमी खेळत आहेतं आणि युवक रमी खेळून मरत आहेत.असे प्रहारचे नेते बच्चू कडू म्हणाले.

Post a Comment

0 Comments