religious news, मानवी जीवनात सुखासोबतच दुःख व अनेक समस्या - प पूज्य पंडित प्रदीप मिश्रा



सनातन धर्माचे महत्व केले अधोरेखित 

वैजापूर, ता .30 / प्रतिनिधी -

मानवी जीवनात सुखासोबतच दुःख व अनेक समस्या येत असतात. पण त्यावर मात करण्यासाठी स्वतःला श्री शंकर अर्थात भोलेनाथाच्या स्वाधीन करून दृढ निश्चयी बनले पाहिजे. विश्वास, मेहनत व संयमाचे फळ निश्चितपणे मिळते. श्री शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करून ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमोस्तुभ्यम चे स्मरण केल्यास मानवाची अध्यात्मिक ताकद वाढते व यातूनच समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते. एक लोटा जल सब दुःखो का हाल हा शिव महापुराण संदेश आहे असे प्रतिपादन कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी वैजापुरातील शिवमहापुराण कथेच्या पाचव्या दिवशी केले. आजच्या भागात महाराजांनी सनातन धर्माचे महत्त्व अधोरेखित केले.

नागपूर मुंबई महामार्गाजवळ लाडगाव चौफुलीलगत असलेल्या विस्तीर्ण मैदानावर श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे मागील चार दिवसांपासून पंडित प्रदीप मिश्रा यांचे बेलपत्र शिव महापुराण सुरु आहे. विशाल संचेती, उद्योजक जीवनलाल संचेती व बाळासाहेब संचेती यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला राज्यभरासह देशातील अनेक भागातून भाविक दाखल झाले आहेत. कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी या कथेचे श्रवण केले. आजच्या कार्यक्रमात महाराजांनी सनातन धर्माचे महत्त्व सांगितले. परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी अविरत भक्तीची गरज आहे. मात्र या भक्तीचा देखावा करता कामा नये असे महाराज म्हणाले. ईश्वर प्राप्तीसाठी मनात भक्तीभाव असणे अत्यंत गरजेचे आहे हे महाराजांनी सोदाहरणं सांगितले. त्यांनी भगवान श्रीकृष्ण व रुख्मिणीचा दाखला दिला. रुख्मिणीने सत्संग केल्यामुळे श्रीकृष्णबाबत तिच्या मनात प्रेम भावना जागृत झाली. त्याचप्रमाणे शिव महापुराण कथा, कुबरेश्वर धाम, बाबा का धाम याविषयी ऐकल्यानंतर तिथे जाऊन दर्शन करण्याची भावना मनात उत्पन्न होते. 


यावेळी महाराजांनी पवित्र गंगा नदी पृथ्वीतलावर आणण्यासाठी भगीरथाने केलेल्या तप साधनेची कथा सांगितली. तप करूनही गंगा नदीने पृथ्वीवर येण्यास नकार दिल्यानंतर भगीरथाने भगवान शिव शंकराची आराधना केली. तरीही श्री शंकर प्रसन्न न झाल्याने भगीरथाने शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर शिव प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या जटामध्ये गंगेला धारण करून पवित्र नदीला पृथ्वीवर आणले. असे शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे महत्व असल्याचे महाराजांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. मंगळवारी कथेचा सहावा दिवस असून दोन जून सकाळी आठ ते अकरा यावेळेत कथा सांगितल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले.


फ़ोटो: वैजापूर शहाराजवळ लाडगाव चौफुली येथे उभारण्यात आलेल्या शिवकल्पवृक्ष नगरी येथे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचे बेलपत्र शिव महापुराण कथेच्या पाचव्या दिवशी महाराजांनी कथा सांगितली.

Post a Comment

0 Comments