Today news, वैजापूर पंचायत समितीमध्ये लाखोंचाअपहार ; ऑपरेटरने ग्रामपंचायतींचा 75 लाखांचा निधी स्वतःच्या खात्यात वळवला.


चार विस्तार अधिकाऱ्यांसह सतरा अधिकाऱ्यांना नोटीस  

वैजापूर, ता .24 / प्रतिनिधी - वैजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बारा ग्रामपंचायतीचे जवळपास 75 लाख रुपये ऑपरेटरने स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्याचा प्रकार आठ दिवसांपुर्वी उघडकीस आला आहे.या प्रकारामुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. परंतु प्रशासनाने हे प्रकरण अद्याप उघड केलेले नाही.

शासनाच्या विविध योजनांचा निधी ग्रामपंचायतीला शासनाकडून देण्यात येतो.हा निधी डी एस सी (डीजीटल सिग्नेचर काॅम्प्युटर )  द्वारे संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती संस्थाना मारण्यात येतो.ग्रामपंचायत साठी डी एस सी म्हणजे एक प्रकारे एटीएम कार्ड असते.सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावाने ही डी एस सी असते. गटविकास अधिकारी यांचा सुद्धा या डी एस सी संबंध असतो. सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांना प्रत्येक व्यवहार झाल्यानंतर संदेश मिळतो. वेगवेगळ्या योजनांच्या निधीचे वाटप करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या खासगी ऑपरेटरकडुन काम करून घेते.
अशाच कामाचे पेमेंट वाटप करताना  बारा ग्रामपंचायतीच्या निधी एका खासगी ऑपरेटर ने जवळपास 75 लाख स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा केले आहे. संबंधीत व्यापारी व ज्यांचे घेणे आहे.असे लोक ग्रामपंचायतीकडे चकरा मारायला लागल्यावर हा प्रकार उघडकीस आला.गटविकास अधिकारी यांना हा प्रकार समजल्या नंतर त्यांनी तात्काळ गुरुवारी बैठक घेऊन अपहाराची रक्कम त्वरीत खात्यावर भरण्यासाठी सुचना दिल्या‌.या प्रकारामुळे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर हे रजेवर गेले आहेत.तसेच जिल्हा परिषदेतील वरीष्ठ संबंधित अधिकाऱ्यांनी वैजापूर येथे भेटी देऊन बैठका घेतल्या आहेत.खासगी ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या अविनाश पवार नावाच्या व्यक्तीने हा घोटाळा केला असून त्याने आपले सरकार सेवा केंद्र नावाचे डमी खाते यासाठी उघड केल्याचे समोर आले आहे.

चार विस्तार अधिकाऱ्यांसह 13 अधिकाऱ्यांना नोटीस 

या प्रकरणी  तालुक्यातील चोरवाघलगाव, हाजीपूरवाडी, आंचलगाव, रघुनाथपुरवाडी, मनेगांव, खरज, भिवगांव, अव्वलगांव, सटाणा ,भग्गाव ,बेलगाव, वडजी, तलवाडा या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच विस्तार अधिकारी अमेय पवार, बी.आर.म्हस्के, दीपक अकोलवाड, आर.एल. राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 24 तासाच्या आत खुलासा करण्याचे या नोटिसीत म्हटले आहे.

खरज येथील तरुणाचे आज उपोषण 
 तालुक्यातील खरज ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार झाला असून, हा निधी सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने ऑपरेटरच्या नावे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी खरज येथील सुनील कुंदे हे गुरुवारी (ता.24) पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.



Post a Comment

0 Comments