today news, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद निर्णायक टप्प्यावर ; मूळ याचिकेवर ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचा ? याचा फैसला होणार 


मुंबई ता.14 -शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद आता निर्णायक टप्प्यावर आला असून सर्वोच्च न्यायालयात मुख्य प्रकरणावर 20 ऑगस्टला अंतिम सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित असून आता याचा सोक्षमोक्ष लावायचा असल्याचे संकेत न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमाला बागची यांनी सोमवारी (ता.14) झालेल्या सुनावणीत दिले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालय ऑगस्टमध्ये करणार आहे. शिंदे गटाला आगामी पालिका निवडणुकांमध्ये धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, यासाठी तातडीने सुनावणी घ्या अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सोमवारी न्यायालयात केली. यावर न्यायालयाने शिवसेनेच्या मूळ याचिकांवर ऑगस्टमधे सुनावणी घेण्यास तयारी दर्शविली आहे. आम्हाला हा विषय लवकर निकाली काढायचाय ,असे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. दरम्यान, न्यायालयाने 20 ऑगस्टला सुनावणी निश्चित केली असून, दोन वर्षे रखडलेल्या या प्रकरणात ' तारीख पे तारीख' चे सत्र थांबणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अंतरिम अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवारी न्या.सूर्यकांत आणि न्या. जॉयमाला बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यातर्फे यांनी युक्तिवाद केला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना कधीही जारी केली जाऊ शकते. त्यामुळे न्यायालयाने  शिवसेनेच्या मूळ याचिकांवर लवकरात लवकर सुनावणी घेऊन निकाल द्यावा अशी विनंती केली. त्यावर शिंदे गटाचे वकील अँड. निरज किशन कौल यांनी आक्षेप घेतला.तथापि न्या. सूर्यकांत यांनी आम्हाला हा विषय लवकर निकाली काढायचाय असे स्पश्ट करून मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर 20 ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली.

Post a Comment

0 Comments