news today, मन्याड व कोल्ही प्रकल्पात 100 टक्के तर ढेकू धरणात 58.37 टक्के पाणीसाठा

धरणे भरल्याने परिसरातील शेतकरी सुखावला 

         मन्याड साठवण तलाव 100 टक्के भरले आहे.. 

वैजापूर, ता.19 / प्रतिनिधी - तालुक्यातील डोंगरथडी भागात असलेल्या शिऊर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या भागातील विविध प्रकल्पात मोठा पाणीसाठा उपलब्ध झाला असून परिसरातील अनेक गावांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मन्याड साठवण तलाव व कोल्ही मध्यम प्रकल्पात 100 टक्के तर ढेकू मध्यम प्रकल्पात 58.37 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, कोल्ही धरण तुडूंब भरल्यामुळे ओव्हर फ्लो चे पाणी सांडव्यातून वाहू लागले आहे.  शिवना  टाकळी प्रकल्पातही 88.32 टक्के पाणीसाठा असून या प्रकल्पातूनही उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. 

         

    कोल्ही मध्यम प्रकल्पात मोठा पाणीसाठा उपलब्ध                 सांडव्यातून बोर नदीत पाणी वाहू लागले आहे 

अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पाऊस परतला असून गेल्या पंधरा ऑगस्टपासून शिऊर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या भागातील छोट्या मोठ्या प्रकल्पात मोठ्याप्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. कोल्ही धरणातून तालुक्यातील शिऊर, खंडाळा, कोल्ही, आलापुरवाडी या गावांना पाणी पुरवठा होतो. गेल्या दोन तीन वर्षापासून पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने कोल्ही मध्यम प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे या भागात शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी मात्र जानेफळ, हिलालपुर व कोरडगांव परिसरात जोरदार पाऊस झाल्याने कोल्ही मध्यम प्रकल्पात पाण्याची मोठी आवक होऊन प्रकल्प 100 टक्के भरले आहे. कोल्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यातून बोर नदीत पाणी वाहू लागले आहे. नदीवरील छोटे मोठे बंधारे पाण्याने भरले असून हे पाणी बोर दहेगांव मध्यम प्रकल्पाकडे झेपावले आहे.

Post a Comment

0 Comments