news today, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खंडपीठाकडून रद्द


वैजापूर, ता .02 / प्रतिनिधी-- जमिनीचा ताबा देण्यासाठी शिवीगाळ व मारहाण केल्यामुळे पतीने चिठ्ठी लिहून व्हिडिओ बनवून आत्महत्या केल्याचे म्हणत पत्नीने दाखल केलेला गुन्हा व त्या अनुषंगाने सत्र न्यायालय वैजापूर येथे पोलिसांनी दाखल केलेली कार्यवाही औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकनवाडी आणि न्यायमूर्ती एस.ए. देशमुख यांनी रद्द केली आहे.
वैजापूर  न्यायालयाने देखील हा गुन्हा रद्द केला होता.याप्रकरणात अँड समीन बागवान व अँड मोहसीन पठाण यांनी काम पाहिले.

वैजापूर तालुक्यातील वीरगांव येथील गणेश दुर्योधन नाईक व रामदास दुर्योधन नाईक यांनी 2021 मध्ये सटाणा येथील योगेश गिरजाबा सोमवंशी यांच्याकडून एक एकर जमीन खरेदी केली होती. त्यानंतर सुमारे सात महिन्यांनी योगेश सोमवंशी याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ व चिठ्ठी लिहून गणेश नाईक व रामदास नाईक हे जमिनीचा ताबा देण्यासाठी छळ करत असून व पैसे परत घेऊन जमिनी नावावर करून देत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा आरोप करत जुलै 2022 मध्ये आत्महत्या केली होती. त्यावरून योगेशची पत्नी मोहिनी सोमवंशी यांनी गणेश नाईक व रामदास नाईक यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण करून जखमी करणे व इतर कलमांखाली गणेश नाईक व रामदास नाईक व इतर एक जण यांच्या विरोधात वैजापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून वैजापूर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
त्याविरोधात गणेश नाईक व रामदास नाईक यांनी सदरचा एफआयआर, आरोपपत्र व सत्र न्यायालय वैजापूर येथील या प्रकरणातील संपूर्ण कारवाई रद्द करण्यासाठी ॲड.देविदास आर. शेळके यांच्यामार्फत औरंगाबाद येथील खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत कागपत्रांच्या आधारे अर्जदारांविरोधातील सदरचे आरोप हे तथ्यहीन असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी पक्ष आणि आरोपींच्यावतीने नियुक्त वकिलांनी सदरची कारवाई रद्द करण्यास जोरदार विरोध केला. सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदारांनी मयत योगेशचा कधी मारहाण करून छळ केला याबाबत काहीही तपशील नसल्याने ते आरोप बिनबुडाचे वाटतातक असे न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे तथ्य आणि कायद्याचा विचार केला असता अर्जदारांनी मयत योगेश यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही गुन्हा केल्याचे दिसून येत नाही, असे निरीक्षण नोंदवत अर्जदारांच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांच्या अनुषंगाने सत्र न्यायालय वैजापूर येथे दाखल फौजदारी कारवाई खंडपीठाने रद्द केली. 

अर्जदारांच्या वतीने अँड .देविदास आर शेळके यांनी युक्तिवाद केला. तर शासनाच्यावतीने ॲड.गोविंद कुलकर्णी यांनी तर फिर्यादी तर्फे ॲड.श्रीराम देशमुख यांनी युक्तिवाद केला.

Post a Comment

0 Comments