news today, श्रीक्षेत्र देवगांव शनि येथील सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या सप्ताह सोहळ्याची आज सांगता

सांगता सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार 

वैजापूर, ता.06 / प्रतिनिधी - तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगांव शनि सप्तक्रोशी येथे सुरू असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज यांचा 178 वा हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाची आज सांगता होत असून, सांगता सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ. रमेश पाटील बोरणारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता समाप्ती होणार आहे.

आज हरिनाम सप्ताहाच्या सांगता निमित्ताने 450 पोते बुंदी प्रसादाचे वाटप 15 हजार स्वयंसेवक व महिला मंडळ 400 ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे करणार आहेत. यावेळी सुमारे दहा लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज सप्ताह कमिटीने व्यक्त केला आहे. आतापर्यंत देवगाव पंचक्रोशीतील गावोगावच्या तरुण मंडळे, महिला मंडळ व विविध शाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आमटी, भाकरी, खिचडी, फराळ वाटपाचे काम चांगल्याप्रकारे केल्याबद्दल ह.भ.प. रामगिरी महाराज व आ. रमेश पाटील बोरणारे यांनी त्यांचे कौतुक केले.

सप्ताह सांगता सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी राहणार असल्याने पोलीस प्रशासन व सप्ताह कमिटीने त्यादृष्टीने तयारी केली आहे.


Post a Comment

0 Comments