एक तास वाहतूक ठप्प ; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला
वैजापूर,(वा.) मुंबईहून परतणाऱ्या मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवल्याची घटना शनिवारी (ता.30) दुपारच्या सुमारास तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्यावर घडली. यामुळे साधारणतः तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांच्या फास्टॅगमधून पैसे वजा झाल्याने हा वाद उफाळून आला अन् टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी त्यांची 'हमरीतुमरी' झाली. वैजापूर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्यानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
शनिवारी सकाळी समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याची घटना घडली. या वादामुळे महामार्गावरील एक्झिट पॉइंटवर वाहनांची मोठी रांग लागली होती. मराठा आरक्षणाबाबत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे, त्याच आंदोलनातील काही आंदोलक समृद्धी महामार्गाने वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील एक्झिट पॉईंटवरून बाहेर पडत होते. त्यानंतर त्यांच्या वाहनातून फास्ट टॅगद्वारे पैसे कापण्यात आले. आंदोलकांना मोकळे सोडण्याच्या मुद्द्यावरून टोलनाक्यावर वाद सुरू झाला. यावेळी ऑपरेटरने अपशब्द वापरल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी टोल नाका बंद केला. टोल नाका बंद असल्याने ही बाब महामार्गाच्या नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचली. याशिवाय वैजापूर पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक लहासे, सुरक्षा पर्यवेक्षक कृष्णा बडे, हेड कॉन्स्टेबल डेडवाल, कल्याण बहुरे, सुरक्षा रक्षक संजय लोहार, जंजाळ यांनी
तात्काळ टोल नाक्यावर धाव घेतली व आंदोलकांची समजूत काढली. पोलिस निरीक्षक ताईतवालेंनी बारकोड स्कॅन होऊन फास्ट टॅगची रक्कम ऑनलाईन कापली जाते. त्यामुळे ऑपरेटर आणि अन्य कुणी काहीही करू शकत नाही. मराठा आंदोलन अतिशय शांततेत सुरू आहे, कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये. याची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. म्हणून मागे उभ्या असलेल्या शेकडो वाहनांना जाता यावे म्हणून टोल सुरू करा. हे ऐकून आंदोलकांनी होकार दिला आणि त्यांनी वाहने घेऊन चालते झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
0 Comments