वैजापूर ता.01/ प्रतिनिधी - शासनाच्या आदेशानुसार 31 ऑगस्ट हा दिन सुटी असतानाही राज्यभर "भटके विमुक्त दिवस" म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वैजापूर येथेही उपविभागीय अधिकारी कार्यालयात रविवारी (ता.31) उपजिल्हाधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाण पत्र वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी या दिनाची माहिती विशद केली. ते म्हणाले की, ब्रिटिश काळात 1871 साली ब्रिटिश सरकारने कायदा काढुन भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांना गुन्हेगार समजले. त्यांच्यावर अत्याचार केले, मात्र देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने 31 ऑगस्ट,1952 रोजी ब्रिटिश कायदा रद्द केला व नवीन कायदा काढला ज्यात या जातीच्या लोकांना न्याय दिला. भटक्या -विमुक्त जातीच्या लोकांचा राज्य सरकार व देशाच्या प्रगतीत मोठा वाटा आहे म्हणून दरवर्षी 31 ऑगस्ट हा दिन" भटके विमुक्त दिवस" म्हणून साजरा करावा असे शासनाने आदेशीत केले. त्याचाच भाग म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यालयात हा दिन डॉ.अरुण जऱ्हाड यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे असे राजपूत म्हणाले.
भटक्या विमुक्त जाती आणि जमाती समाजाच्या मुलां-मुलींना जातीचे प्रमाणपत्र डॉ.अरुण जऱ्हाड यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षकवर्ग ही उपस्थित होता. शिक्षकांनी या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, त्यांच्या जातीच्या नोंदी व्यवस्थित घ्याव्यात, आरोग्य तपासणी करून घ्यावी असेही राजपूत यांनी शिक्षकाना आवाहन केले.
नायब तहसीलदार सूरज कुमावत, जात प्रमाण पत्र विभाग लिपिक सुनील बछे, योगेश पुंडे, सेतु सुविधा केंद्राचे गोरख मापारी, शिक्षक गोमलाडू,शेलार, रहातवळ व पालक यावेळी उपस्थित होते.
0 Comments