news today, सामाजिक उपक्रमात गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महसूल सप्ताहनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानचे आयोजन 

छत्रपती संभाजीनगर, दि.04 (जिमाका) - पर्यावरण रक्षण, स्वच्छता अभियान, वृक्षरोपण, रक्तदान यासारख्या गाव विकासाच्या सामाजिक उपक्रमात गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे,कअसे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
महसूल सप्ताहानिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी (ता .04) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रमाणपत्र दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यात जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, फेरफार दाखले, शिधापत्रिका इत्यादींचा समावेश होता.त्याप्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,वउपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी अनिल घनसावंत, तहसिलदार शिवानंद बिडवे, अपर तहसिलदार डॉ.परेश चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महसूल विभाग हा आपल्या जीवनाशी निगडीत विभाग आहे. पूर्वी विविध कारणांने कामांमध्ये दिरंगाई होत असे. मात्र आता तंत्रज्ञानाचा अंगिकार झाल्याने कामांचा वेग वाढला आहे. जीवनमानात सुधारणा करतांना महसूल विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यात नागरिकांनी आपला सहयोग द्यावा,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. अपर जिल्हाधिकारी अडकूणे यांनी महसूल सप्ताहात आयोजीत विविध उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments