today news, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदावरून विजय पवार यांची उचलबांगडी ; पंकज ठोंबरे यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

वैजापूर, ता.05 / प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वैजापूर तालुकाध्यक्ष पदावरून विजय पवार यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांची पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी नगरसेवक शेख रियाज यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. 

गेल्या आठवड्यात पक्ष निरीक्षक संजय जाधव हे पक्षाच्या बैठकीसाठी वैजापूरला आले होते, यावेळी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदावरून पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. पक्ष निरीक्षक जाधव यांच्यावर दोन स्वतंत्र बैठका घेण्याची नामुष्की ओढवली होती. शहरातील ठक्कर बाजार येथील पक्षाच्या कार्यालयात आणि मुरारी पार्क येथे झालेल्या बैठकीत पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षक संजय जाधव यांच्यासमोर आपापसातील मतभेद उघडपणे मांडले. या बैठकीत तालुकाध्यक्ष पदावरून चर्चा तापली .विद्यमान तालुकाध्यक्ष विजय पवार यांना कायम ठेवण्याची मागणी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली तर दुसऱ्या गटाने डोंगरथडी भागातील तरुण कार्यकर्ता विशाल शेळके यांच्या नावाला पसंती दर्शविली होती. पक्षनिरीक्षक जाधव जाधव यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत ऐकून घेतले व
पक्षातील ही अंतर्गत खदखद पाहून जाधव यांनी खेद व्यक्त केला होता. पक्षाच्या एकजुटीसाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी या बैठकीत सांगितले होते.


.           शेख रियाज यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती

पक्षनिरीक्षक संजय जाधव यांनी दिलेल्या अहवालावरून पक्षश्रेठीनी तालुकाध्यक्षपदाचा वाद निकाली काढला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांची नियुक्ती केली आहे. तर शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी नगरसेवक शेख रियाज यांची पक्षाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.







Post a Comment

0 Comments