डॉक्टर, नर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने वाचले आई व नवजात बाळाचे प्राण ...
फाऊंडेशनचे वाहेद पठाण व रुग्णालयातील नर्स
वैजापूर, ता. 28/ प्रतिनिधी - सध्याच्या युगात आपल्या आसपास माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असंख्य घटना घडत असतानाच अजुनही माणुसकी जिवंत असल्याची घटना वैजापूर शहरात घडली. याबाबत माहिती की, बुधवारी (ता. 27) पहाटे 3 वाजता शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर उघड्यावरच मानसिक रोगी महिलेची प्रसूती झाली.
ही महिला तालुक्यातील भटाणा येथील रहिवासी सुवर्णा मोरे (वय 32) असून तिचा पती जयसिंग मोरे हा दारुड्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानेच तिला एकटीला पशुवैद्यकीय दवाखान्याच्या गेटवर सोडून दिले होते. त्यानंतर त्या महिलेची तिथेच प्रसुती झाली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आसरा फाऊंडेशनचे वाहेद अहमद पठाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ उपजिल्हा दवाखान्यात फोन करून तेथील नर्सला बोलावून घेतले. नर्सने तत्काळ प्रसूतीनंतर आई व नवजात बाळाला दवाखान्यात दाखल करत असतानाच त्या मनोरुग्ण महिलेने आलेल्या नर्सवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु नर्सच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर मुंढे आणि त्यांच्या टिमने तात्काळ त्या महिलेवर व नवजात बाळावर आवश्यक उपचार करून घेतले. नवजात बाळ व बाळांतीण यांच्यावर आवश्यक उपचार केल्यानंतर व धोक्याची कोणतीही बाब नसल्याची खात्री झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्यासह आसरा फाउंडेशनचे वाहेद पठाण, प्रकाश पवार, अभिषेक देशमुख, इरफान पठाण, मंगेश खाडे, आमरुत वळवी या टीमने सुवर्णा मोरे व तिच्या नवजात बाळाला सुरक्षितपणे घरी पोहोचवले. त्यामुळे आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याची चर्चा संबंध शहरात आहे.
✍️ नवजात बाळ आणि बाळंतीण दोघांवरही आमच्या टिमने योग्य उपचार केले असून तिच्या घरच्यांचेही योग्य समुपदेशन केले आहे. असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुधाकर मुंढे यांनी सांगितले. तर वैजापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर मानसिक रोगी महिलेची उघड्यावरच प्रसुती झाल्याची माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळी जाऊन महिलेला दवाखान्यात दाखल करून नंतर तिला सुखरूप तिच्या घरी स्वतः जाऊन पोहोच केले. असे आसरा फाऊंडेशनचे वाहेद पठाण यांनी सांगितले.
0 Comments