news today, पुणेगांव - दरसवाडी प्रकल्पाचे पाणी वैजापूर तालुक्याला मिळावे - पाटपाणी संघर्ष समितीचे ना.भुजबळ यांना निवेदन


वैजापूर, ता.04/प्रतिनिधी - राज्यात लागू असलेल्या समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 या धोरणांतर्गत कायम दुष्काळी पट्टयातील वैजापूर तालुक्याला पुणेगांव - दरसवाडी प्रकल्पाचे पाणी शेतसिंचनासाठी आणि पिण्यासाठी मिळवून द्यावे.अशी मागणी पुणेगांव - दरसवाडी पाटपाणी संघर्ष समितीने एका निवेदनद्वारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

ना. भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा अवर्षणप्रवण पट्ट्यात असून या भागात दरवर्षी पाऊस अत्यल्प प्रमाणात पडतो, या जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 734 मी..मी.तर वैजापूर तालुक्यात केवळ 500.02 मी. मी. इतकीच पावसाची वार्षिक सरासरी आहे. पावसाची वार्षिक सरासरी खूपच नगण्य आहे.आणि म्हणूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागातील शेतकऱ्यांना पुरेशा पावसाअभावी दोन्ही हंगामातील शेती पिकांना नेहमीच पाणीटंचाईची झळ बसत असते. कदाचीत येनकेन प्रकारे शेती पिकली तर ती तोट्याची ठरते. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते.आणि शेतक-यांचा आर्थिक व्यवहार कोलमडतो. त्यातून शेतकरी कुटुंबात नैराश्य येते.

आजही आमच्या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचीच नव्हे तर, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पाण्याअभावी परवड शब्दांत वर्णन करता येत नाही. शेतक-यांची स्थिती एकूणच हलाखीची बनलेली जाहीर आहे..एरवी निसर्गाने आमची साथ यापुर्वीच कित्येक वर्षांपासून नेहमीचीच सोडलेली आहे. पर्यावरणाचे संतुलन  आजही तसेच बिघडलेले आहे..त्याकडे म्हणावे तसे सामान्य माणसांचे कुणाचेच लक्ष दिसत नाही. तथापि राज्य शासनाकडून याबाबत काही ठोस उपाययोजना केल्या जाव्यात अशी आशा बाळगून शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहत आहे..पण याबाबत कुणालाही त्याची काळजी किंवा पर्वा वाटत नसावी. आणि म्हणूनच आपण आपल्या शेजारील मतदार संघ असलेल्या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सहकार्य करुन न्याय मिळवून द्यावा.आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील पुणेगांव - दरसवाडी  प्रकल्पाचे पाटपाणी आम्हा वैजापूर तालुक्यातील सर्व सामान्य लोक व शेतकऱ्यांना मिळवून द्यावे व आमची कायमस्वरुपी असलेली पाणी टंचाई दूर करावी.अशी आपणांस राज्याचे एक कणखर आणि बहूजनांचे कर्तृत्वदक्ष नेतृत्व म्हणून विनंती आहे.

निवेदनावर  पुणेगांव -दरसवाडी पाटपाणी कृती समिती छत्रपती संभाजीनगरच अध्यक्ष दादा पाटील घायवट( पानगव्हाणकर), 
कार्यकारी अध्यक्ष नबी पटेल तिडीकर, उपाध्यक्ष सुर्यभान मतसागर, सरचिटणीस भास्कर दादा शिंदे आदींच्या सहया आहेत.

Post a Comment

0 Comments