news today, वैजापूर तालुक्यातील भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची विधानभवनास भेट

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पुढाकार ...

मुंबई, ता.29 - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या मुंबई येथील विधानभवनास अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. या विशेष उपक्रमाचे आयोजन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी विधानसभा, विधानपरिषद व मध्यवर्ती सभागृह प्रत्यक्ष पाहिले. त्यांना विधानभवनातील कामकाजाची प्राथमिक माहिती देण्यात आली. एवढ्या लहान वयातही विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी लोकशाही प्रक्रियेबद्दलची जिज्ञासा आणि आत्मविश्वास उल्लेखनीय होता.


या भेटीदरम्यान मला विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांनी विचारलेल्या निरागस प्रश्नांना मी उत्तर देताना त्यांच्या उत्सुकतेचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले. खेड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे हे चिमुकले विद्यार्थी आज आत्मविश्वासाने विधानभवनाच्या सभागृहात प्रश्न विचारत होते, हा अनुभव अत्यंत आनंददायी व अभिमानास्पद होता.

या प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी अंबादास दानवे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यातील यशासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक फेरोज शेख, सहशिक्षक विजय मित्तेवाड, अर्जुन जाधव, गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर, केंद्रप्रमुख पी.जी.पवार, संतोष जाधव, संतोष आढाव तसेच पालक उपस्थित होते.
लोकशाही प्रक्रियेबद्दलची जाणीव लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दृढ होण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. आजचा अनुभव निश्चितच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला आहे. 

Post a Comment

0 Comments