news today, लोणी खुर्द येथील पुलाची उंची वाढवा - विद्यार्थी व ग्रामस्थांची मागणी



 लोणी खुर्द, ता.30/ प्रतिनिधी -  वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द या बाजारपेठेकडे येणारा तिंत्तरखेडा या रस्त्याला पावसाळ्यात नदीचा अडथळा कायम भेडसावत आहे. शाळकरी मुले, महिला व वृद्धांना या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. नदीच्या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत विद्यार्थी,  महिला, नागरिक यांना  पावसाळ्यात रोज ये जा करावी लागते.या कसरतीत जीव मुठीत धरून चालावे लागते. जास्त पाऊस पडल्यानंतर या नदीत वाहून जाण्याचा धोका  कायम असल्याने तातडीने नळ्या टाकून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी केली  आहे.


हा रस्ता तिंत्तरखेडा, निमगोंदगाव, पेंडेफळ, आलापुरवाडी आदी गावांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. दररोज हजारो नागरिकांचे दळणवळण याच रस्त्याने होत असले तरी, पावसाळा आला की या रस्त्याचे महत्त्व कमी न होता नागरिकांचे संकट मात्र वाढते. शाळकरी मुले नदी ओलांडून जीव धोक्यात घालून शाळेत जातात, तर शेतकरी व इतर नागरिकांना देखील कामासाठी याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.

या संदर्भात वेळोवेळी मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतलेली नाही. “एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय  प्रशासन जागे होणार  नाही की काय. ?” असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

Post a Comment

0 Comments