news today, झेडपी - पंचायत समिती निवडणूक धुरळा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात

27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार...

मुंबई, ता.25 - राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि झेडपी अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आरक्षणानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता.23) मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गट आणि गणनिहाय अंतिम मतदार याद्या व मतदान केंद्राची यादी 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिध्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका अपेक्षित आहेत.

आधी गट आणि गणाची सुधारित प्रभाग रचना त्यानंतर झेडपी अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. याविरोधात न्यायालयीन लढाईनंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्यादृष्टीने हे पहिले पाऊल मानले जात आहे.
या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाची 1 जुलै 2025 ची मतदार यादी विचारात घेतली जाणार आहे.  गणनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द केली जाईल.त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 27 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय प्रसिध्द करण्यात येईल. त्यानंतर लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होऊन निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.


Post a Comment

0 Comments