गोदावरी नदी पात्रात शनिवारी रात्री थरार !
शेतकऱ्यावर केला गोळीबार, दोन जण बालंबाल बचावले
वैजापूर,ता. 24 - गोदावरी नदीपात्रात शनिवारी मध्यरात्री वाळू तस्करांचा थरार पाहायला मिळाला.शेतकऱ्यांवर वाळू तस्करांनी गोळीबार केल्याची घटना बाभुळगाव गंगा शिवारात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये वीरगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगरसेवकाचा समावेश आहे.
अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही शेतकरी घटनास्थळी गेले असता तस्करांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत दोघे शेतकरी बालंबाल बचावले आहेत.
बाभुळगावगंगा येथील जालींदर सोपान कुंजीर यांची गोदावरी नदीपात्रात गट नंबर 51मध्ये विहीर आहे. या विहीरीवरील विद्यूत पंप सुरू करण्यासाठी जालींदर हे गेले होते. त्याचवेळी गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करी करीत असलेले त्यांच्याकडे पळत आले. त्यांनी जालींदर यांना पकडून ठेवत शिवीगाळ करून मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जालींदर यांनी त्यांचे चुलत भाऊ विजय सर्जेराव कुंजीर यांना ही घटना सांगितली. विजय व परीसरातील शेतकरी गोदावरी नदी पात्रात आले. परंतु वाळू तस्करांचा रौद्र अवतार पाहून सर्व जण अंधारात पळाले. वाळू तस्करांनी पाठलाग करत विजय व जालींदर यांना काठीने बेदम मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पीडित शेतकरी जालींदर सोपान कुंजीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरूद्ध जीवघेणा हल्ला, बेकायदेशीर जमाव जमवणे, धमकी देणे आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार विरगाव पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमची माहिती पोलिसांना का देता म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे
आरोपीमध्ये अर्जुन खुशाल दाभाडे, उद्देश अशोक मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी बबन ढमके, राहुल चव्हाण, विजय उर्फ भोगर भास्कर हटांगळे, मंगेश साहेबराव साळवे, विजय पवार, राहुल थोरात (सर्व.रा.गोंधवणी ता.श्रीरामपूर जिल्हा अहील्यानगर) या नऊ जणांचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी अर्जून दाभाडे हा श्रीरामपूर नगर परिषदेचा अपक्ष नगरसेवक आहे. दोन महिन्यांपूर्वी वाळू तस्करीतून एकाचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप असून तेव्हापासून तो फरार असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणी विरगाव पोलीस स्टेशनमध्ये गु.र.क्रमांक - 167/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 189(2), 191(2), 1991(3), 190, 115(2), 352, 351(2), 351(3) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास विरगाव पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0 Comments