मुंबई, ता.25 - राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले मंत्री आणि आमदार यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार आपले एक महिन्याचे वेतन मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देतील, असे घोषित केले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पक्षाचे सर्व मंत्री,आमदार आणि खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे घोषित केले आहे.
राज्यातील अतिवृष्टी संकटाच्या पार्श्वभूमीवर राजपत्रित अधिकारी महासंघानेही सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी ही माहिती दिली.
भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना शेतकऱ्यांना 5 कोटी देणार..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार त्यांचे सर्व मंत्री आमदार आणि विधान परिषद सदस्य आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करतील.असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. पक्षाच्या एकूण 51 सदस्यांचे (41 विधानसभा आमदार, 9 विधान परिषद सदस्य आणि एक अपक्ष) 92 लाख 92 हजार जमा होतील. शिवसेना 64 सदस्यांचे (57 विधानसभा आमदार, 7 विधान परिषद सदस्य) सुमारे 1 कोटी 16 लाख 60 हजार 800 रुपये जमा होतील. भाजपच्या 132 विधानसभा आमदारांसह 22 विधान परिषद सदस्य असे एकूण 154 आमदार प्रत्येकी 1 लाख 82 हजार 200 देणार आहेत. एकूण 2 कोटी 80 लाख 68 हजार रुपये जमा होतील. अशी एकूण 4 कोटी, 90 लाख 20 हजार 800 रूपयांची मदत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून अतिवृष्टीग्रस्तांना होणार आहे.
0 Comments