वैजापूर, ता.24 - पुलावरून मोटारसायकलने कॉलेजला जात आलेल्या दोघांपैकी एक विद्यार्थी ढेकु नदीला आलेल्या पुरात बुडाला असता प्रसंगावधान राखून उपस्थित युवक व गावकऱ्यांनी त्याला वाचवले. ही घटना मंगळवारी (ता.23) सकाळी वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक येथे घडली.
ऋषिकेश प्रभाकर पिंगट (18 वर्ष) असे बचावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
बाभुळगाव बुद्रुक येथील ऋषिकेश पिंगट व राम थोरात हे बारावीचे शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी मोटारसायकलवर सकाळी नऊ वाजता गारज येथे कॉलेजला जात होते. ढेकु नदीला आलेल्या पुरामुळे बाभुळगाव बुद्रुक शिवारातील पुलावरुन पाणी वाहत होते.या पुलावरुन जात असताना पाण्याचा वेग जास्त असल्याने मोटारसायकल वाहून गेली. राम थोरात याने मोटारसायकल वरून उडी घेतली .मात्र ऋषिकेश हा मोटारसायकलसह पुलावरून नदीत पडला. मात्र परीसरात असलेल्या युवक व गावकऱ्यांनी तात्काळ प्रसंगावधान साधून ऋषिकेश यास मोटारसायकलसह पाण्याबाहेर काढले. त्यामुळे तो बालंबाल बचावला .
बचावकार्यात तौसिफ शेख, रवी चोपडे, निलेश तेझाड, बाबासाहेब तुपे, अमोल तेझाड, सुनील तेझाड, काशिनाथ तुपे , समीर शेख, ईश्वर गायकवाड, विवेक तेझाड, किशोर घुमरे, रामेश्वर सोनवणे, पाटील, सागर वाघचौरे, मुस्ताकिम शेख, सागर खंडागळे आदीनी प्रयत्न केले. दरम्यान, बाभुळगाव बुद्रुक शिवारातील ढेकु नदीच्या पुलाची उंची खूप कमी आहे.त्यामुळे कमी पाणी आले तरी गारज ते धोंदलगाव मार्गावरील वाहतूक बंद होते. नेहमीच या मार्गावरील संपर्क तुटत असल्याने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.
0 Comments