अनेक गावात पाणी शिरले ;अग्निशमन दलाच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
प्रभाकर जाधव
------------------------
गारज ता. 28 - वैजापूर तालुक्यातील गारजसह परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यातच रात्री शिवना, खडकी, खारी, ढेकु या नद्यासह ओढ्या-नाल्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या मालेगाव, झोलेगाव, बायगाव, लाखणी, मांडकी, उंदीरवाडी, राहेगाव, सोनवाडी, शिवगाव, बाभुळगाव बुद्रुक, बाभुळगाव खुर्द, पाथरी या गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दोन्ही बाभुळगावच्यामधून वाहणाऱ्या ढेकु नदीच्या पुलावरुन मोठ्याप्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी पी.व्ही मोगल, पान पाटील, सरपंच आणासाहेब गायकवाड, सरपंच आणा चौधारी , मंडळ अधिकारी अभय साब्दे, महसूल अधिकारी गहिरे, शिऊर पोलीस स्टेशनचे एपीआय वैभव रणखांब, बीट जमादार गणेश गोरक्ष व पोलीस पाटील यांनी केले आहे. नद्याकाठच्या शेतीचे व शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून विद्युत तारासह पोल कोसळले आहेत. ढेकु नदीच्या काठावरील गारज, शिवगाव येथील शेतकऱ्याचे विहिरी पाण्यात खंगाळल्या आहे तर अतिवृष्टीमुळे जांबरखेडा येथील इंदुबाई धोंडीराम बारसे यांचे घर पूर्णपणे पडले असून घराच्या भिंतीखाली शेजारच्या सुमनबाई लंबे यांचे पन्नास पीव्हीसी पाईप दबल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोनू नदीच्या काठावर असलेले किशोर बाबूलाल राजपूत यांची मोठ्याप्रमाणात जमीन वाहून गेली आहे. खडकी नदीला मोठ्याप्रमाणात पूर आल्याने बायगाव येथील जाधव वस्ती व शिवनेरी वस्तीवरील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने संपूर्ण मका, कपाशी आदी पिके पाण्यात तरंगले आहे. नद्या नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बाभुळगाव बुद्रुक येथील बाजारतळात पाणी शिरले आहे. बाभुळगाव खुर्द येथील झोपडपट्टीत पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.
शिवना, ढेकु व खारी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आले असून मका, कपाशी, ऊस,अद्रक, भुईमूग या पिकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिके खराब होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी तर मका पिकात पाच ते सहा फूट पाणी तुंबल्याने मकाचा शेंडा दिसत आहे. शनिवारी झालेल्या पावसाची 168 मीमी नोंद झाली आहे..या अतिवृष्टीने साठवलेला कांदा पाणी ललागून खराब झाला आहे. सोंगलेल्या मक्याच्या कणसे पाण्यात भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार काय मदत करणार या आशेने शेतकरी पाहत आहे.
पुराच्या पाण्यामुळे वाड्या - वस्त्यावर अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यु करून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने शनिवारी रात्रीपासुन वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.. आमदार प्रा रमेश पाटील बोरणारे हे सतत ग्रामस्थांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत आहे
यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अभय साब्दे, तलाठी अभीषेक म्हस्के, ग्रामपंचायत अधिकारी कैलास गायके, एपीआय वैभव रनखांब, बीट जमादार गणेश गोरक्ष हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
0 Comments