crime news, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ; पानवी खंडाळा येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

वैजापूर येथील लाॅजवरील घटना; प्रेमसंबंधातून वाढवली जवळीक 


वैजापूर, ता. 23 - तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वैजापूर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिक येथील एका 23 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गोकुळ शिवाजी बावचे रा. पानवी खंडाळा (ता.वैजापूर) याच्याविरुद्ध गुरुवारी (ता.2) रात्री  वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नाशिक येथील तरुणी ही गेल्या दोन वर्षांपासून वैजापूर येथील एका फार्मसी महाविद्यालयात डी-फार्मसीचे शिक्षण घेत होती. त्याचबरोबर शहरातील एका खासगी रुग्णालयात पार्टटाईम नर्स म्हणूनही काम करत होती. याच दरम्यान, उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या गोकुळ बावचे याच्याशी तिची ओळख झाली. ही ओळख हळूहळू संवादात बदलली आणि पुढे दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. 

तक्रारीनुसार, गोकुळ हा तरुणीला अनेकदा वैजापूर शहरातील गंगापूर रोडवरील एका चर्चित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत होता. भेटीगाठींचा सिलसिला पुढे वाढत गेला आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तरुणीचा आरोप आहे की, 10 जुलै 2025 रोजी त्याने तिला लाडगाव रोडवरून रोटेगाव येथील एका लॉजमध्ये नेले. तिची इच्छा नसतानाही लग्नाचे आश्वासन देत तिच्यासोबत प्रथमच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर जुलै 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत आरोपी तिला वेगवेगळ्या वेळी लॉजमध्ये घेऊन जात लग्नाचे आश्वासन देत संबंध ठेवत राहिला.

तरुणी जेव्हा लग्नाबाबत विचारणा करत होती, तेव्हा तो काही वेळ मागत लवकरच लग्न करू असे आश्वासन देत होता. एप्रिल आणि मे 2026 दरम्यानही त्याने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला सोबत नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

अखेर स्वतःची फसवणूक झाल्याची भावना झाल्यानंतर तरुणीने वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी  गोकुळ शिवाजी बावचे (रा.पानवी खंडाळा ता.वैजापूर) याच्याविरुद्ध बलात्कार तसेच ॲट्राॅसिटी  कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे करत आहेत.



Post a Comment

0 Comments