news today, वैजापूर शहरासह तालुक्यात पावसाचा हाहाकार ; शेतीपिकांसह घरांचे मोठे नुकसान

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून परिस्थितीची पाहणी 

.पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वैजापुरला भेट देऊन य  परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आ.रमेश बोरनारे, माजी आमदार  कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष साबेर खान ..

वैजापूर, ता.27 - मागील तीन चार दिवसांपासून वैजापूर शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शनिवारी (ता.27)  रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील छोटी- मोठी धरणं भरली असून नद्या नाल्यांना पूर आला आहे. शेती पिकांसह जनावरे व घरांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आ.रमेश पाटील बोरणारे, भाजपाचे डॉ.दिनेश परदेशी यांनी रात्रभर जागून मदत व बचाव कार्य केले. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज वैजापूर तालुक्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.


शनिवारी (ता.27) सायंकाळपासून तालुक्यात वादळी वारा व 
विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.रात्रभर पाऊस सुरू होता. पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस व पुराच्या पाण्यामुळे शहरालगतच्या नारंगी धरणासह तालुक्यातील ढेकू, कोल्ही व बोर दहेगाव या धरणासह मन्याड साठवण तलाव, जरुळ लघु तलाव, खिर्डी लघु तलाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शिवना टाकळी मध्यम प्रकल्पासह नारंगी, ढेकू व कोल्ही धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून नद्यांना पूर आला आहे.

नारंगी धरणातून 1584 क्युसेकने पाणी विसर्ग ...

पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणात 90.53  टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून  शनिवारी (ता.27) सायंकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडून 72 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. 72 क्युसेकने होत असलेला विसर्ग वाढवून 432 क्युसेक करण्यात आला रात्री.एकच्या सुमारास विसर्ग 800 कयुसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर पहाटे पुन्हा विसर्ग वाढवून तो 1584 करण्यात आला. नारंगी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण होऊन नारंगी नदीकाठच्या देवी मंदिर परिसर, इदगाह नगर, दत्तवाडी भागात तसेच शिवराई रस्त्यावरील पंचशील नगर, मिल्लतनगर, भारतनगर पाणी साचून घरांचे नुकसान झाले. वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेला देवी मंदिर समोरील पूल पाण्यात वाहून गेला. तर नदीकाठच्या डवाळा, खंबाळा, गोयगाव, भऊर, किरतपूर, हिंगोणी, कांगोणी, नारायणपूर, पुरणगाव, नगिना पिंपळगाव या भागात वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरले तसेच अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांसह जनावरे व घरांचे मोठे नुकसान झाले. शहरातील दत्तवाडी नारायणपूर येथे पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच तालुक्यातील बाभुळगाव खुर्द, भिवगाव, लोणी खुर्द येथेही रेस्क्यू करून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.  

लोणी खुर्द येथील इंदिरानगर भागात पाणी शिरल्याने अडकलेल्या महिलेला रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोर नदीला पूर आला असून बोरदहेगाव धरण 85 टक्के भरले आहे. पाण्याची आवक सुरुच असल्याने धरणाची पाणी पातळी कायम ठेवून बोर  दहेगाव धरणातून 288 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. बोर नदीला पूर आला असून पुराचे पाणी परसोडा गावात शिरले आहे. शिवना, बोर व नारंगी या नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पूरग्रस्तांना दिलासा..

शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे वैजापूर शहरातील पंचशीलनगर व इतर भागात घरांचे मोठे नुकसान झाले असून काही घर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज त्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. या कठीण प्रसंगी प्रशासन सर्वतोपरी मदतीसाठी त्यांच्यासोबत उभे असून तात्काळ पुनर्वसनाची कार्यवाही सुरू करण्यात येईल व त्यासाठी 25 कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

आपदग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन 

दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट व आ.रमेश बोरणारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. आपदग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
आ. रमेश पाटील बोरणारे, भाजपचे डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत ही मंडळी काल रात्रीपासून मदत व बचाव कार्य करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
 

.      

Post a Comment

0 Comments