news today, अन् कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांचे फोन खणखणले ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या 'फोन करो' आंदोलनाला मोठा प्रतिसाद

नाशिक ता.14 - कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असून अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांद्याच्या दरवाढीसाठी आमदार, खासदारांसह सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने शुक्रवारपासून (ता.12) पुढील सात दिवस 'फोन करो'आंदोलन पुकारले आहे.

राज्यभरातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्या मतदार संघातील आमदार, खासदारांसह थेट मंत्र्यांना फोन लावून कांद्याचा प्रश्न उपस्थित करून जाब विचारत आहेत. सतत खणखणणाऱ्या फोनमुळे लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना जेरीस आणले आहे. शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री व लोकप्रतिनिधींचे फोन नंबर समाज माध्यमांवर पाठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळपासूनच फोन लावून कांद्याचा प्रश्न उपस्थित करून दराबाबत जाब विचारला. या आंदोलनाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला.

सद्या मिळणाऱ्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.त्यामुळे आंदोलनाने जोर धरला. या आंदोलनात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, धुळे, छञपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव जिल्हयातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, संजय शिरसाट, खासदार संदीपान भूमरे, डॉ.शोभा बच्छाव, निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, गोपीचंद पडळकर, डॉ. राहुल आहेर, ओमराजे निंबाळकर, दिलीप बनकर, नितीन पवार यांना फोन करून कांदा दरवाढ करण्यासाठी आपण काय पाठपुरावा करणार अशी विचारणा केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

याच पद्धतीने पुढील सात दिवस आंदोलन सुरू राहणार...

शेतकऱ्यांनी कांद्याची सद्यपरिस्थिती मांडत भाव वाढीसाठी नेमके काय प्रयत्न करणार असा सवाल फोन करून विचारला.याच पद्धतीने पुढील सात दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे.
भारत दिघोळे - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 


Post a Comment

0 Comments