वैजापूर, ता.14- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी शुक्रवारी (ता.12) रात्री गावठी कट्टा, जीवंत काडतुस व इतर साहित्यासह ताब्यात घेतले. अमोल साईराम गायकवाड व गोविंद निवृत्ती पवार (रा.बेलगाव ता.वैजापुर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. तर लक्ष्मण उर्फ लखन नामदेव जगताप, विक्रम उर्फ विकी बाळासाहेब बोरगे ( दोघे रा.भग्गाव ता.वैजापुर) व ईतर दोन जण ज्यांची नावे माहित नाहीत असे चौघेजण पळून गेले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे (ग्रामीण) पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, मुंबई - नागपुर हायवेलगत बेलगाव शिवारातील इंडीयन ढाब्यासमोर एका हुंदाई कंपनीच्या वरना कारमध्ये पाच ते सहाजण थांबलेले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उप निरीक्षक महेश घुगे, हवालदार श्रीमंत भालेराव, सचिन राठोड, बलवीरसिंह बहुरे, शिवाजी मगर यांनी सापडा रचून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी कारमध्ये बसलेल्या अमोल गायकवाड व गोविंद पवार (रा.बेलगांव ता. वैजापूर) या दोघांना पकडले तर चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी पळून गेलेल्या चौघांपैकी दोघांची नावे लक्ष्मण उर्फ लखन जगताप व विक्रम उर्फ विकी बोरगे असल्याचे सांगितले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, नायलॉन दोरी, वायर कापण्याचे कटर, लोखंडी सळई, चाकू आदी साहित्य मिळून आले. एक लाख 59 हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.पोलीस अधीक्षक डॉ.विनय कुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
0 Comments