news today, नगरपालिका निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर ; 8 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार

प्रारूप मतदार यादीवर 13 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना 

वैजापूर, ता.01 - राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगर पंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता.30) जाहीर केला आहे. त्यानुसार 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

प्रभाग रचना कार्यक्रमानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी प्रभागांची अंतिम रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. पालिका व नगरपंचायती निवडणुकांसाठी विधानसभेची मतदार यादी वापरण्यात वापरण्यात येणार असून 1 जुलै 2025 ला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचे आदेश निवडणुका आयोगाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने 21 ऑगस्ट 2025 च्या अधिसूचनेनुसार 1जुलै 2025 ही (cut off date) जाहीर केली असून त्यादिवशी म्हणजेच 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदारयादी या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वापरण्यात येईल. या मतदारयाद्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने 16 जुलै2025 रोजी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
नगरपालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि नगरपरिषद व नगर पंचायतीसाठी केलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान असणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे.
प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन संबंधित मुख्याधिकारी यांनी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी अंतिम करणे.  जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने 8 ऑक्टोबर 2025 ते 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्राप्त हरकती व सूचनावर नियमाप्रमाणे विचार करून प्रभाग निहाय मतदारयादी अंतिम करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.



Post a Comment

0 Comments