news today, विनायक सहकारी साखर कारखाना सुरू करा - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

वैजापूर, ता.26 - गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला वैजापूर तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना  पूर्ववत सुरू सुरू करण्यात यावा अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांच्या नेतृत्वखाली शिष्टमंडळाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कारखाना सुरू करण्यात बाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन सहकार मंत्री स्व. विनायकराव पाटील यांच्या प्रयत्नांतून साखर कारखाना सुरू  करण्यात आला होता. स्थापनेच्या काळात या कारखान्याने स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळपाची उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली व परिसरातील रोजगार निर्मितीत मोलाचे योगदान दिले. मात्र, गेल्या सुमारे 20–22 वर्षांपासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, ऊस उत्पादक व कामगार यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कारखान्याच्या बंद अवस्थेमुळे पुढील समस्या निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी दूरच्या कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत असून वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारखान्यातील कामगारांचे अनेक वर्षांचे वेतन थकीत असून काही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. कारखाना बंद असल्याने परिसरात असुरक्षितता वाढली असून भंगार साहित्य चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. कारखान्याची यंत्रसामग्री व अधोसंरचना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार व ऊस लागवडीचा विस्तार यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असे नमूद करून निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.

विनायक सहकारी साखर कारखान्याचे तातडीने पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय व वित्तीय प्रक्रिया त्वरीत सुरू करण्यात याव्यात. पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावर विशेष आर्थिक सहाय्य योजना जाहीर करून कारखान्याच्या यंत्रसामग्री, ऊस खरेदी व गाळप सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. कारखान्याचे भागधारक, ऊस उत्पादक, कामगार प्रतिनिधी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने संयुक्त समिती स्थापन करून कारखाना पुन्हा चालू करण्याचा ठोस आराखडा तयार करण्यात यावा. कारखाना बंद असताना थकीत असलेले कामगारांचे वेतन व इतर लाभ मंजूर करण्यात यावेत

विनायक सहकारी साखर कारखाना हा फक्त औद्योगिक प्रकल्प नसून, तो परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनरेषेशी निगडीत आहे. माजी सहकार मंत्री विनायकराव पाटील यांच्या सहकार चळवळीतील वारसा पुढे नेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना पुन्हा चालू करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकरी, कामगार व परिसरातील नागरिक यांना दिलासा मिळेल म्हणून या महत्त्वाच्या कारखान्याचे पुनरुज्जीवन करून सुरू करा अशी मागणी श्री विशाल शेळके यांनी केली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती एल.एम.पवार, आबासाहेब साळुंके आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments