news today, वैजापूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 अ आणि 2 ब च्या निवडणुकीस स्थगिती

20 डिसेंबरला होणार निवडणूक ; सुधारित कार्यक्रम जाहीर 

वैजापूर, ता.30 -  वैजापूर नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 1 अ आणि 2 ब मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली होती. उमेदवारांच्या अपीलावर 23 नोव्हेंबरला किंवा त्यानंतर आदेश पारीत झाले असतील त्याठिकाणी नियमांचे पालन होऊ शकणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही स्थगिती दिली आहे. आता या दोन जागांसाठी नव्याने 20 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक घेण्यात येईल. 

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांना अवघे 48 तास शिल्लक असतानाच निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री हा निर्णय जाहीर केला. यात प्रामुख्याने ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, या संदर्भात 22 नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर न झालेल्या ठिकाणी निवडणुका स्थगित करून त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थगिती देण्यात येणाऱ्या या सर्व ठिकाणी सुधारित वेळापत्रकानुसार 20 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाविरोधात काही ठिकाणी उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणांचा निकाल 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत येणे अपेक्षित होते.जेणेकरून संबंधित नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास ती दिवसांचा कालावधी मिळाला असता. त्याचबरोबर नियमानुसार पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असते. मात्र, निकालाला लागलेल्या विलंबामुळे ही प्रक्रिया पार पडलेली नाही. परिणामी निवडणूक आयोगाने अशा निवडणुकांचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय शनिवारी रात्री जाहीर केला. 

वैजापुरात प्रभाग क्रमांक 1 अ आणि 2 ब ची निवडणूक स्थगित 

वैजापूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 अ हा  अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असून यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बक्ष शेख सुमैय्या सोहैल यांनी तर शिवसेना शिंदे गटातर्फे शेख मसिरा परवीन मो.अशफाक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून या दोन्ही आपसात नातलग आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बक्ष शेख सुमैय्या यांच्या उमेदवारी अर्जावर शिंदे गटाच्या उमेदवार शेख मसिरा परवीन यांनी आक्षेप दाखल केला होता तर प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये भाजपचे उमेदवार विशाल संचेती यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीप बोर्डे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. संचेती यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला होता. या निर्णयाविरुद्ध संचेती यांनी न्यायालयात दाद मागितली होती व न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता.
 





 



 





Post a Comment

0 Comments